बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे झालेल्या राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र शब्दात प्रहार केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना त्यांनी म्हटलं की, “शेतकरी आत्महत्या करण्यापेक्षा हक्कासाठी लढा द्या.”
या परिषदेला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात मला काहीच येत नाही. पण मग आत्महत्या का करतोस? आत्महत्येऐवजी अन्यायाविरोधात उभं राहा.”
कडू म्हणाले, “ही परिषद वेदनेची आणि दुःखाची आहे. दिवाळीच्या दिवशी सुद्धा ही बैठक घ्यावी लागतेय. तुम्ही विचारांची लढाई सोडली आणि जातीपातीच्या राजकारणात अडकलात म्हणून शेतकरी मागे पडला. जर सोयाबीनला योग्य भाव मिळत नसेल, तर शेतकऱ्यांनी निदर्शने करायला हवीत.”
ते पुढे म्हणाले, “या सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा, निळा अशा रंगांत विभागलं. त्यामुळे शेतकरी एकजूट हरवली. शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी अडीच लाख रुपयांची नोकरी सोडली, बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीने लढाई संपवली, पण आपणच आपल्याच नेत्यांना पाडलं.”
शहरातील आमदार आणि ग्रामीण भागातील वास्तवावर टीका करताना कडू म्हणाले, “शहरातले आमदार परवडतात, पण शेतकऱ्यांचा आमदार सरकारला परवडत नाही. तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते. पण शेतकरी मात्र स्वतःचं अस्तित्व विसरत चाललाय.”
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना लढाऊ बनण्याचे आवाहन करत म्हटलं, “मरण्यापेक्षा लढा सुरू करा. मालाला योग्य भाव मिळाला तर आम्हीच लोकांना नोकरी देऊ शकतो. आरक्षणामुळे काही समाज सुखी होतील, पण मालाला भाव मिळाला तर संपूर्ण गाव सुखी होईल.”
ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना जातीधर्मात विभागल्याने ते एकत्र येत नाहीत. नाहीतर एका दिवसात सरकार बदलून जाईल. मोदींनी अमेरिकेतून कापसाच्या गाठी मागवल्या तरी मीडियात बातमी नाही, कारण अर्धा मीडिया भाजपच्या मालकीचा आहे. जोपर्यंत मातीची किंमत होत नाही, तोपर्यंत समाज सुधारत नाही.”
शेवटी बच्चू कडू म्हणाले, “पंजाबच्या शेतकऱ्यांनी १३ महिने आंदोलन करून काळे कायदे मागे घेतले, आणि आपण मात्र बायकोची आठवण आली की घरी जातो. थोडं धैर्य दाखवा, शेतात जितकी मेहनत करता त्याच्या एक टक्का मेहनत आंदोलनात केलीत तर परिस्थिती बदलेल. सर्व रंगांचे झेंडे घेऊन शेतकरी एकत्र आले, तर सुखाचे दिवस लांब नाहीत.”