गोवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी गोव्यातील नेव्हल बेसवर भारतीय नौदलाच्या वीर जवानांसोबत साजरी केली. INS विक्रांतवरून जवानांना संबोधित करताना त्यांनी आत्मनिर्भर भारताचे आणि मेड इन इंडियाचे प्रतीक असलेल्या या युद्धनौकेचं गौरवगान केलं आणि पाकिस्तानला कठोर शब्दात इशाराही दिला.
“विक्रांतच्या नावानं पाकिस्तानची झोप उडाली”
पीएम मोदी म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं की, विक्रांत या नुसत्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली. ज्याचं नाव शत्रूच्या साहसाचा शेवट करेल ते म्हणजे INS विक्रांत. आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडियाचं हे सर्वात मोठं प्रतीक आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या तिन्ही सैन्यदलांमधील असाधारण समन्वयामुळे पाकिस्तानला रेकॉर्ड वेळेत गुडघे टेकायला भाग पाडलं. मी पुन्हा एकदा सशस्त्र दलातील वीर जवानांना सलाम करतो.”
“वीर जवानांसोबत दिवाळी साजरी करणं माझं सौभाग्य”
जवानांशी संवाद साधताना पीएम मोदी म्हणाले, “तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणं माझं सौभाग्य आहे. माझ्या एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला माझ्या वीर सैनिकांचं सामर्थ्य आहे. समुद्रावरील सूर्यकिरणांची चमक म्हणजे वीर जवानांसाठीच्या दीपमाळा आहेत.”
ते पुढे म्हणाले, “INS विक्रांतवर काल घालवलेली रात्र शब्दात वर्णन करणं कठीण आहे. हे जहाज लोखंडाचं असलं तरी त्यात जेव्हा तुम्ही उतरता, तेव्हा त्यात शौर्य आणि जिवंतपणा उतरतो.”
“डिफेन्स एक्सपोर्ट 30 पटीने वाढला”
पंतप्रधान मोदींनी भारताच्या संरक्षण क्षमतेबद्दल बोलताना सांगितलं, “आता सरासरी 40 दिवसांनी एक नवीन स्वदेशी युद्धनौका किंवा पाणबुडी नौदलात सहभागी होत आहे. आमच्या ब्राह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्रांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान आपली ताकद दाखवली आहे. मागच्या दशकात भारताचा डिफेन्स एक्सपोर्ट तब्बल 30 पटीने वाढला असून, यात डिफेन्स स्टार्टअप्सचं मोठं योगदान आहे.”
शेवटी पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझी दिवाळी खास बनली आहे. देशाच्या प्रत्येक वीर जवानाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. INS विक्रांतवरून देशवासियांना सुद्धा दीपावलीच्या शुभेच्छा देतो.”