पुणे : जैन बोर्डिंग जमीन घोटाळा प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. दानवे यांनी मोहोळ यांच्यावर केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करत, रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
धंगेकरांच्या आरोपांवर दानवे यांचा प्रतिसाद
पत्रकार परिषदेत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “धंगेकर जे बोलले त्याची चौकशी झाली पाहिजे. मुरलीधर मोहोळ हे केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करत आहेत. जैन समाजाच्या हॉस्टेलच्या प्रकरणात एका बिल्डरचा आणि त्यामागे मोहोळ यांचा संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे.”
ताज हॉटेल वादावर प्रतिक्रिया
दिल्लीतील ताजमहाल हॉटेलमध्ये उद्योजिका श्रद्धा शर्मा यांच्यासोबत झालेल्या अपमानास्पद वागणुकीबाबतही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. “ती महाराष्ट्राची मुलगी आहे, आणि जर तिला कोल्हापुरी चप्पल घातल्यामुळे अपमानित करण्यात आलं असेल, तर महाराष्ट्राच्या सर्व मुलींनी अभिमानाने कोल्हापुरी चप्पल घालून अशा ठिकाणी जावं,” असं दानवे म्हणाले.
महेश कोठारे यांच्या वक्तव्यावर टीका
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारे यांनी ‘मी भाजपचा भक्त आहे’ असं वक्तव्य केलं होतं. यावर दानवे म्हणाले, “स्टेजवर जाऊन लोणी लावून घेणं ही सवय झाली आहे. कोठारे हे उत्तम कलाकार आहेत, पण जर ते राजकीय पक्षाचं समर्थन करत असतील, तर लोक त्यांना तसं पाहतील.”