मुंबई : मुंबईतून ‘ठाकरे ब्रँड’ला नष्ट करून महाराष्ट्रावर ताबा मिळवण्याचे कारस्थान उघडे पडले आहे. राज ठाकरे हे सुद्धा या ठाकरे ब्रँडचे घटक आहेत आणि भविष्यात याचा फटका त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात पण महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. या शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत प्रकरणावरुन राज ठाकरेंना साद घातली आहे.
शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं मत संजय राऊत यांनी मांडले आहे. गेल्या काही दिवसांत अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना हा वाद देशभरात गाजतोय. कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केल्यापासून ते तिने मुंबईला पीओके आणि नंतर पाकिस्तानाची उपमा देईपर्यंत या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मौन बाळगले.
मुंबईत येण्यास मला नकार देण्यासाठी मुंबई कुणाच्या बापाची नाही, असे खुले आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले. तेव्हा मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. भारतीय जनता पार्टीने कंगनाचे सातत्याने समर्थन केले. तर महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून कंगनाच्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यात आला.
या सर्व घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मात्र मौन बाळगले. कंगना आणि शिवसेनेच्या संघर्षात राज ठाकरेंनी सोयिस्कररित्या मौन बाळगले आहे का ? नवीन राजकीय समीकरणांमुळे राज ठाकरे शांत आहेत का? मुंबई आणि मराठी माणसाच्या मुद्यावर उभी राहिलेली मनसे मुंबईला पीओके आणि पाकिस्तान म्हटल्यावरही शांत कशी, अशी चर्चा सोशल मीडियावरही रंगली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* शिवसेनेच्या मुखपत्रात काय म्हटलंय?
शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी ‘मुंबईचे खच्चीकरण कुणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची !! या मथळ्याखाली लेख लिहिला आहे.
या लेखात त्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख करत मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी होत असताना ते शांत का असा प्रश्न उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणतात, ” महाराष्ट्राची राजधानी मुंबईला ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. मुंबईला पाकिस्तान आणि बाबर म्हणणाऱ्यांच्या मागे भारतीय जनता पार्टी उभी राहते हे दुर्देवच म्हणावे लागेल.”
“सुशांत आणि कंगनाच्या मागे उभे राहून भाजपला बिहार निवडणुका लढायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय रजपूत आणि क्षत्रिय मते मिळवण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल.”
“ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रँड आहेत. मुंबईतून या ब्रँडला नष्ट करायचे व महाराष्ट्रावर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हे सुद्धा याच ठाकरे ब्रँडचे घटक आहेत आणि भविष्यात याचा फटका त्यांनाही बसणार आहे.”
“शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात पण महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवशी मुंबईचे पतन होण्यास सुरुवात होईल.”
* शिवसेना बॅकफूटवर गेलीय ?
दादर, परळमधील शिवसैनिकांच्या मनात सध्या हीच भावना आहे की अर्णब गोस्वामीनी बाळासाहेबांच्या काळात ही अशी आगपाखड केली असती तर काय झालं असतं? खळ्ळखट्याकचे दिवस गेले आता ! रणकंदन ही शिवसेनेची रणनीती होती. ती आज नाही. कंगना रणौतबद्दल शिवसेनेनं जी रणनीती आखली ती पार फसली. ‘मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर मला हात लावून दाखवा’, अशी धमकी तिनं दिली होती. ती तशी आलीही. कंगना मुंबईत उतरण्याच्या काही मिनिटं आधी तिच्या कार्यालयाचं अवैध बांधकाम पाडून तिच्या येण्यावरील मीडियाचा फोकस शिवसेनेनं हटवला; पण बुलडोझर चालविल्याच्या घटनेनं कंगनाला विनाकारण सहानुभूतीही मिळाली. त्यामुळे कंगना प्रकरणात शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे बोलले जात आहे.