मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोना काळात सध्यातरी मी राजकारणावर बोलणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव आखला जात आहे त्याविषयी मी एकदा मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून बोलणार असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “तुर्त मी राजकारणाविषयी बोलणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव आखला जात आहे त्याविषयी मी एकदा मुख्यमंत्रिपदाचा मास्क थोडावेळ बाजूला काढून जरुर बोलणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडे उत्तरं नाहीत असं नाही. पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेलो आहे. त्याला अनुसरुन काम करावं लागतं. यावेळी त्यांनी कोरोनासह अनेक विषयांवर भूमिका व्यक्त केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उद्धव ठाकरे म्हणाले, “जी भीती होती तेच झालं, कोरोनाचं संकट संपलेलं नाही, तर ते वाढतच चाललं आहे. जगभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याची परिस्थिती पाहायला मिळते आहे. पुणे, मुंबई, सांगली अशा अनेक ठिकाणी कोरोना हातपाय पसरत आहे. इतर राज्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. विधानसभा अधिवेशनही दोन दिवसात संपवावं लागलं. सर्वच पक्षांनी यात सहकार्य केलं, त्या सर्वांचं मी धन्यवाद देतो. एकूणच सर्वजण आपआपली जबाबदारी ओळखून वागत आहोत.”
* डिसेंबरपर्यत लस येईल
कराटेचं प्राविण्य दाखवणारा ब्लॅक बेल्ट आता मास्क म्हणून तोंडावर बांधायचा आहे. सेल्फ डिफेन्ससाठी हे महत्त्वाचं आहे. लस कधी येणार याविषयी खूप चर्चा चर्वणं होत आहेत. मात्र, डिसेंबरपर्यंत लस येईल अशी आपल्याला आशा आहे. तोपर्यंत सातत्याने मास्कचा वापर करावा. कारण नसताना बाहेर पडू नका. बाहेर पडताना अंतर ठेवा आणि मास्कचा वापर करा,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
* 12 कोटी कोरोना चाचणी अशक्यप्राय
ऑक्सिजन कमी पडत आहे, मात्र तयार झालेला ऑक्सिजन आरोग्य विभागाला देण्याचा नियम बनवण्यात आला आहे. ऑक्सिजन उपलब्ध करणं हे आरोग्य विभागाचं प्राधान्य आहे. 12 कोटी नागरिकांची कोरोना चाचणी अशक्यप्राय गोष्ट आहे. पण पुढील काळात प्रत्येक घरात त्यांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी किमान दोनदा वैद्यकीय कर्मचारी जातील असा प्रयत्न असेल. लहानपणीचे संस्कारच आपल्याला कोरोनाने सांगितले आहेत. घराबाहेरुन आल्यावर हातपाय धुणे महत्त्वाचे आहे. वाटलं तर अंघोळ करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या साध्या गोष्टी आहेत, मात्र त्या पाळा. कुणाच्याही तोंडावर बोलू नका, ऑनलाईन खरेदीवर बर द्या. गर्दी नसलेल्या वेळीच बाहेर पडा. कमी बोला, घरुन काम करा.”
“आपण सर्वच धर्मियांनी आपआपली सामाजिक जबाबदारीचं भान ठेऊन संयम पाळला. तुम्हा सर्वांना धन्यवाद. पुनश्च एकदा हरिओम म्हणत आपण आपल्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कार्यालयांमध्ये उपस्थिती वाढवण्यावरही भर देत आहोत. जिल्हांतर्गत प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे.”
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री