सोलापूर : मंगळवेढा येथील सबजेल 40 मधील 28 कैद्यांचे अहवाल रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. कैद्यांबरोबरच एक पोलिस अधिकारी, दोन सुरक्षारक्षक व एका डबेवाल्यासह दिवसभरात 32 रुग्ण आढळून आले आहेत.
याबाबतचा अहवाल शुक्रवारी रात्री देण्यात आला. संस्थात्मक विलगीकरण केलेल्यांमधील सलगर बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले तर नंदूर येथील रुग्णाशी संबंधित असलेल्याची रॅपिड ऍटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली.
सबजेल मधील 12 कैद्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नवीन तहसील कार्यालयातील जेलमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. सलगर बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे संबंधित असलेल्या 41 कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये 39 रिपोर्ट हे निगेटिव्ह आले, तर दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यापूर्वी रुग्णाशी संबंधित कर्मचाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते व 305 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते.
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयामध्ये शुक्रवारी 119 रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 28 कैदी, एक पोलीस अधिकारी व दोन सुरक्षा रक्षक व एक आहार पुरवठादार असे 32 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 12 कैदीचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यांना तहसील कार्यालय येथे जेल स्थापन करून विलगीकरण केले असल्याचे उदयसिंह भोसले (उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा) यांनी सांगितले.
यात न्यायालयीन कोठडीतील पाच पुरुष व दोन महिला व पोलीस कोठडीतील पाच पुरुष कैदी असा 12 जणांचा समावेश आहे आतापर्यंत ग्रामीण व शहराच्या विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्य वाढतीच होती; मात्र आता पोलिस व कारागृहातही कोरोनाने शिरकाव केल्यामुळे पोलिस प्रशासनावर मोठे संकट आले आहे. तर सलगर येथील डॉक्टरांच्या संपर्कातील एक परिचारिका व एक लिपिक असे दोघेजण पॉझिटिव्ह आढळले आहे.