सोलापूर : कोरोनाला हरवायचे असेल, त्याची साखळी तोडायची असेल तर आपल्याला घरातच लॉकइन होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पहाटेपासूनच शहरात चिडीचूप शांतता पसरल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून आले. सोलापूरकरांनी आज शुक्रवारपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला उस्फुर्त प्रतिसाद दिला.
नेहमी पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी दिसणारी गर्दी नाही, विनाकारण किराणा, औषधे, भाजीपाल्याच्या बहाण्याने बाहेर पडणारे तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ मात्र कुठेच दिसून आली नाही. मोठ्या चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त मात्र दिसून आला.
नागरी वसाहतीत सकाळपासूनच पोलिसांची राऊंड सुरू झाली. पोलिसांना खाकीचा धाक दाखवण्याची गरजच पडली नाही; कारण शहरवासिय विनाकारण बाहेर पडलेच नाहीत. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडेतीन हजारांपर्यंत तर साडेतीनशेपर्यंत मृत्यूचा आकडा पोचला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून, प्रशासनाने पुन्हा शुक्रवारपासून 26 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे.
शहरवासीयांनीही आता गेल्या लॉकडाउनच्या वेळी केलेली चूक आता करायची नाही, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी घरातच राहून प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचे ठरवल्याचे सुनसान रस्ते पाहून दिसून आले.