मुंबई : भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. भाजपाकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी होतीय तर आता अनिल देशमुखांनी घूमजाव केला असून तसे आपण जाहीररित्या बोलू शकत नसल्याचे म्हटले आहे.
राज्यातले काही आयपीएस अधिकारी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा नवा शोध वाचाळवीर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लावल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. तसेच या अधिकाऱ्यांनी असं केलं असेल तर गृहमंत्री म्हणून सरकारने काय कारवाई केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अतुल भातखळकर म्हणाले, “वाचाळवीर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील काही आयपीएस अधिकारी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते असा नवीनच शोध लावलाय. यामुळे पहिला प्रश्न हाच आहे की या आयपीएस अधिकाऱ्यांवर गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी काय कारवाई केली? याची माहिती त्यांनी जनतेपासून इतके दिवस का लपवून ठेवली?”
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी सुशांतप्रकरणावरुन मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. “या गृहमंत्र्यांच्या आयपीएस अधिकाऱ्यांना दिशा सालीयन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दोन महिने होऊनही एक इंचही पुढे सरकता आलं नाही त्यांना राज्य सरकार पाडण्याचं बळ कुठून आलं? त्यामुळे या अधिकाऱ्यांनी असं काही केलं असेल तर त्यांच्यावर जरुर कारवाई करावीच, पण या वाचाळवीर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा ताबोडतोब राजीनामा द्यावा, अशी भाजपची मागणी आहे,” असंही मत अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलं.
* गृहमंत्र्यांचा आता घूमजाव
चुकीचे विधान माझ्या तोंडी टाकण्यात आलं आहे. व्हिडीओ क्लिपिंग पाहा. मी या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही, इतकंच बोललो होतो” अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, या दाव्यावरुन घूमजाव केले.
* गृहमंत्री काय म्हणाले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न चार ते पाच पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला” असे अनिल देशमुखांनी सांगितले होते.
“आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहे असे वारंवार सांगितले गेले. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमच्यात याविषयी चर्चा झाली होती. त्यानंतर हे प्रकरण मार्गी लावण्यात आले, असेही देशमुख म्हणाले होते.
“शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरुन बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या असे सांगितले होते. तसेच, एका नेत्याने चारही अधिकाऱ्यांची नावे त्यावेळी सांगितली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वेळीच थांबवला गेला” असा दावाही अनिल देशमुख यांनी केला होता.
नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलींमध्ये त्यातील अधिकाऱ्यांची बदली केली गेली. तर काही अधिकाऱ्यांना आजही महत्त्वाची पदं दिली आहेत, असेही अनिल देशमुख म्हणाले होते.