बार्शी : सोलापूर- बंगळुरु महामार्गावर वाळूचा ट्रक आणि कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात चौघे ठार झाले आहेत. अपघातग्रस्त कार बार्शीतील असून मृतामध्ये दोघे बार्शीतील तर दोघे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील रहिवाशी आहेत. ही कार बार्शी येथून प्रवाशी घेवून गेली होती.
अपघातस्थळावरच तिघांचा मृत्यू झाला तर अल्पवयीन मुलगी अपघातानंतर काही तासांनी उपचार घेत असताना मरण पावली. येथील संभाजी नगर येथील रहिवाशी असलेला प्रकाश बाळासाहेब बनसोडे हा आपल्या इंडिका कारमधून प्रवाशी वाहतूक करत असे. त्याचा मित्र संदीप कांबळे याने त्यास कळंब तालुक्यातील एक भाडे आणले होते. एक युवक आणि त्याच्यासमवेतच्या अल्पवयीन मुलीला बेंगलोर येथे पोहचवयाचे भाडे त्यांनी स्विकारले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लांबचा पल्ला असल्याने तो स्वत:ही बदली चालक म्हणून बनसोडे याच्यासमवेत गेला होता. बंगळुरु महामार्गावर कोप्पल जिल्ह्यातील कुष्टगी शहरातून त्यांची कार जात असताना वाळू भरलेला ट्रक चुकीच्या मार्गाने येवून त्यांना धडकला. त्यामुळे वेगात असलेल्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.
या अपघातात प्रकाश बनसोडे, संदीप कांबळे व कळंब येथील तो युवक डोक्याला आणि सर्वांगाला प्राणघातक जखमा होवून जागेवरच ठार झाले तर ती मुलगी अत्यवस्थ झाली. अपघातानंतर कुष्टगी पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली आणि मुलीला उपचारासाठी दाखल केले. ते दोघेही घरातून पळून आलेले होते व बंगळुरु येथे विवाह करण्यासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे.