बार्शी : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेला बार्शी बंद आज कडेकोटरित्या शांततेत पार पडला. यावेळी आरक्षण समर्थकांनी तहसीलदारांना निवेदनाव्दारे आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासहित विविध मागण्यांचे सादर केले.
शिवराज्य सेनेचे अध्यक्ष ॲड. हर्षवर्धन पाटील यांनी पंचायत समिती समोरील पाण्याच्या टाकीवर चढून आरक्षण समर्थनाच्या घोषणा दिल्या. जिल्हास्तरीय नियोजनाप्रमाणे स्थानिक आमदारांच्या घरासमोर आसूड ओढ व हलगीनाद आंदोलन करण्यात आले. शहरातील विविध संघटनांनी बंदला पाठींबा दिला.
‘बार्शी बंद’ची तयारी गेले अनेक दिवस चालू होती. त्याचवेळी शहरातील विविध व्यवसायिकांच्या संघटनेला निवेदन देवून त्यांचे सहकार्य अपेक्षिण्यात आले होते. त्यानुसार सर्व संघटनांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे आजचा बंद कडेकोटरित्या पार पडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात, राज्यात 32 टक्के मराठा समाज असून राज्य शासनाने न्या. गायकवाड आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार विधिवत दिलेले आरक्षण उच्च न्यायलयानेही योग्य ठरविले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिल्यामुळे समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आरक्षणावरील स्थगिती ताबडतोब उठवावी. स्थगिती उठविल्याशिवाय शासनाने कसलीही नोकरभरती करु नये. विद्यार्थ्यांचे चालू वर्षाचे प्रवेश आरक्षण गृहित धरुनच करावेत. मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेसाठी व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, पंजाबराव देशमुख विद्यार्थी वसतीगृहासाठी तत्काळ निधी द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.