अकलूज : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये रोष वाढला असून कोर्टाने दिलेली स्थगिती त्वरित उठवण्यात यावी. आरक्षण लागू करावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अकलूजमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. आज (सोमवारी) दिवसभर अकलूज आणि परिसरात सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. त्यास माळशिरस तालुक्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जय शंकर उद्यान अकलूज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीरशैव लिंगायत समाज, दलित महासंघ ,युवा सेना ,योद्धा प्रतिष्ठान, विश्वकर्मा युवक संघटना आदी समाज संघटनांच्यावतीने मराठा आरक्षणाची पाठिंब्याची पत्रे सुपुर्द केली. यावेळी आमदार राम सातपुते यांनी आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खंबीरपणे पाठिशी असल्याचे आश्वासन दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रारंभी महिला भगिनीच्या हस्ते जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अकलूज चे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका विशद केली.
शाहीर राजेंद्र कांबळे, शेखर खिलारे ,श्रीनिवास कदम पाटील, प्रिया नागणे ,धनंजय साखळकर, नानासाहेब वरकड ,लक्ष्मणराव आसबे आदींनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडली. प्रास्ताविक उत्तमराव माने शेंडगे यांनी केले.