दुबई : रॉयस चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 13 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला आहे. बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हान दिले होते. मात्र बंगळुरुने हैदराबादला 153 धावांवर ऑलआऊट केले. हैदराबादला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आले नाही. हैदराबादकडून जॉन बॅरिस्टोने सर्वाधिक 61 धावा केल्या.
तर बंगळुरुकडून फिरकीपटू युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर नवदीप सैनी आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली. विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची सुरुवात फारशी चांगली राहिली नाही. दुसऱ्याच ओव्हरमध्ये चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कर्णधार डेव्हिड वॉर्नर रनआऊट झाला. यानंतर जॉनी बेअरिस्टो आणि वनडाऊन आलेल्या मनिष पांडेनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची चांगली भागीदारी केली. ही जोडी तोडायला युझवेंद्र चहलला यश आले. त्याने मनिष पांडेला नवदीप सैनीच्या हाती कॅचआऊट केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विकेट जात असतानाच दुसऱ्या बाजूला जॉन बेअरिस्टो मैदानाला चिपकून होता. जॉन हैदराबादला सावरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यालाही फार वेळ टिकता आले नाही. जॉनला युझवेंद्र चहलने 61 धावांवर बोल्ड केले.
यानंतर हैदराबादची घसरण सुरु झाली. बंगळुरुच्या गोलंदाजीसमोर एकाही खेळाडूला तग धरता आला नाही. विशेष म्हणजे 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 बॅट्समनना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
दरम्यान याआधी हैदराबादने नाणेफेक जिंकून बंगळुरुला फलंदाजी करण्यास भाग पाडले. बंगळुरुची दमदार सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी देवदत्त पडिक्कल आणि एरॉन फिंचने 90 धावांची सलामी भागीदारी केली. पडिक्कल आणि फिंच या जोडीला तोडायला विजय शंकरला यश आले. शंकरने पडिक्कला 56 धावांवर बाद केले. यामागोमाग फिंचनेही विकेट टाकली. कर्णधार विराट कोहलीला आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. विराटही 14 धावा करुन माघारी परतला.
यानंतर एबी डीव्हिलियर्सने तडाखेदार खेळी करत दमदार अर्धशतक ठोकले. बंगळुरुकडून देवदत्त पडिक्कल आणि एबीडी डिव्हिलियर्सने अर्धशतकी खेळी केली. तर हैदराबादकडून अभिषेक शर्मा, विजय शंकर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.