मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असतानाच यात ड्रग्स कनेक्शन हा नवा मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणी सध्या एनसीबीद्वारे तपास सुरु असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली आहेत. सुशांतसिंह आत्महत्या की हत्या याचा तपासाचा विषय बाजूला राहिला असून ड्रग्सचा विषय मोठा होत आहे. यात अनेक दिग्गजांची नावे समोर येत आहेत.
दीपिका पदुकोणनंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याच्या पत्नीचं म्हणजेच अभिनेत्री नम्रता शिरोडकरचं नाव समोर आलं आहे. एका वृत्तानुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K हा कोडवर्ड समोर आला होता. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये या नावांचा उलगडा झाला आहे. त्यानुसार D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा ही नावं समोर आली आहेत.
सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर जया साहा हिच्या KWAN या कंपनीची मॅनेजर करिश्माचे काही व्हॉट्स अॅप चॅट समोर आले आहेत. यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची नावं समोर आल्याचं दिसून येत आहे. यात नम्रता जयासोबत ड्रग्सविषयी चर्चा करताना दिसत आहे. या व्हॉट्स अॅप चॅटमध्ये “मुंबईमध्ये तू मला एमडी देशील आणि त्यानंतर आपण पार्टी करु, असं वचन तू मला दिलं होतंस. मला खरंच एका ब्रेकची गरज आहे”, असं N ने म्हटलं आहे. दरम्यान, यापूर्वी श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान या दिग्गज अभिनेत्रींचीदेखील नावं समोर आली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रकरणात आता दिया मिर्झाचं नाव जोडलं जातं आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये दिया मिर्झाचंही नाव असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समधून केला जातो आहे. एनसीबी दियालादेखील समन्स बजावणार असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र याबाबत एनसीबीने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणात आपलं नाव समोर येताच दियाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर व्यक्त होत दियाने आपली बाजू मांडली आहे. आपल्यावरील सर्व आरोप तिनं फेटाळून लावले आहेत.
* संसदेतही पोहोचला होता ड्रग्जचा मुद्दा
ड्रग्ज तस्करीची समस्या वाढत आहे. देशाच्या तरूण पिढीला ड्रग्जच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यासाठी षडयंत्र रचले आहे. आपले शेजारील देश यासाठी योगदान देत आहेत. दरवर्षी पाकिस्तान व चीनमधून पंजाब व नेपाळ मार्गे आपल्या देशात अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे.” असं भोजपुरी अभिनेते आणि भाजपा खासदार रवि किशन म्हणाले होते.
चित्रपट जगतातदेखील ड्रग्जचे व्यसन जडत आहे. अनेकजणांना अटक करण्यात आलेली आहे, एनसीबी खरोखर चांगले काम करत आहे. मी केंद्र सरकारकडे मागणी करतो की, याप्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच, आपल्या शेजारील देशांचे कटकारस्थान संपुष्टात आणावे.” असेदेखील ते म्हणाले.