पंढरपूर : पंढरपूर – नवीन सोलापूर रोडवरील अहिल्या चौक येथे स्काॅर्पिओने मोटारसायकलीस जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात आज (बुधवारी) सायंकाळी चारच्या सुमारास झाला. शंकर दत्तात्रय गायकवाड (वय 25 , रा. पोहोरगाव) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तो अविवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा अपघात एका पञकारासमोर झाल्याने त्यांनी तात्काळ तालुका पो. नि. किरण अवचर यांना माहिती दिली. यामुळे पळुन जाणारी स्काॅर्पिओ केवळ पंधरा मिनिटात सुस्ते (ता. पंढरपूर) येथे पकडण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पोहोरगाव (ता. पंढरपूर) येथील मोटारसायकल चालक अहिल्या चौकाकडून पंढरपूरला येत होते. अहिल्या चौकाजवळील देवगड मठासमोर (MH 11 BV 2233) या स्काॅर्पिओने मोटारसायकलीस (MH 13 CH 7286) जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेले इसम जखमी झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर स्काॅर्पिओ गाडीमधील तिघांनी गाडीतून उतरत मदत करण्याचा देखावा केला. माञ एक जण जागीच ठार झाल्याचे पाहून स्काॅर्पिओ घेवून एकजण फरार झाला. इतर दोघांनी काहीवेळ मदतीचा देखावा करत पायी चालत अहिल्या चौकाकडे गेले.
याची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पो.हे. का. शिंदे यांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेतले. याच दरम्यान पळून गेलेली स्काॅर्पिओ तुंगतचे सरपंच व इतर तरुणांनी तुंगत – सुस्ते रोडवर पकडली. अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.