नवी दिल्ली : अंबानी यांनी न्यायालयाला सांगितले की एकेकाळी त्यांचे नाव जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतलं जात होतं. मात्र सध्या माझा खर्च माझी बायको आणि कुटुंबातील इतर व्यक्ती उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. मी अत्यंत साधे जीवन जगत असून, माझे खर्च खूप कमी आहेत असेही त्यांनी सांगितले. आपल्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नसून कोर्टकचेऱ्यांचा खर्च उचलण्यासाठी आपण दागिने विकल्याचे त्यांनी सांगितले.
चिनी बँकांकडून अवाढव्य कर्ज घेऊन ती बुडवणाऱ्या उद्योगपती अनिल अंबानी यांनी शुक्रवारी न्यायालयासमोर त्यांची बाजू मांडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे त्यांना बाजू मांडण्याची संधी मिळाली. यावेळी चिनी बँकांच्या वकिलाने त्यांना उलटसुलट प्रश्न विचारले. यातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अंबानी यांनी सांगितले की कोर्ट कचेऱ्या, वकिलांची फी यासाठी लागणारी रक्कम उभी करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेले सगळे दागिने विकून टाकले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपला खर्च आता आपली पत्नी टीना अंबानी उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले. अनिल यांनी बुडवलेल्या कर्जाच्या रकमेचे पैसे त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी चिनी बँकांनी लंडनच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. न्यायालयात उभी केलेली वकिलांची फौज, त्यातल्या प्रत्येकाच्या फी आणि तुमचे राहणीमान तुमच्याकडे उत्पन्नाचा आणखीनही दुसरा मार्ग असावा असे दर्शवत असल्याचे बँकांच्या वकिलांनी अंबानी यांना सातत्याने विचारले होते. यावर अंबानी यांनी आपण साधे जीवन जगत असल्याचे सांगत सध्या ते राहात असलेली जागा ही त्यांच्या भावाची असून त्याचे ते भाडेही देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
जानेवारी ते जून 2020 दरम्यान आपण 9.9 कोटींचे दागिने विकल्याचे अनिल अंबानी यांनी म्हटले आहे. बँकांच्या वकिलांनी अंबानी यांना त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफा आहे का असा प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी उत्तर देताना म्हटले की माझ्याकडे फक्त 1 गाडी असून रोल्स रॉईससारख्या गाड्या असल्याच्या बातम्या या निव्वळ अफवा आहेत. दिवाळखोरीत गेलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनचे मालक अनिल अंबानी यांना मे महिन्यात 717 अब्ज डॉलर्स (5 हजार कोटींपेक्षा अधिक) परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात म्हटले होते की या प्रकरणात अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली असल्याने त्यांना ही रक्कम चुकवावी लागेल. ही रक्कम परत करण्यासाठी अनिल अंबानी यांना 21 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र अंबानी ही रक्कम जमा करू शकले नव्हते. अनिल अंबानी यांच्या खात्यात 31 डिसेंबर 2019 रोजी 40.2 लाख रुपये होते ते 1 जानेवारी 2020 ला 20.8 लाख रुपये झाले होते असं न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
चीनमधील चायना डेव्हलपमेंट बँक, एक्झिम बँक, ICB यासारख्या बँकांनी अनिल अंबानी यांना भलीमोठी कर्जे दिली होती. या कर्जाच्या रकमेचा एकत्रित आकडा हा 15 हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. अनिल अंबानी यांनी रिलायन्स समूहावर 1 लाख कोटींपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. यात रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रा, आरकॉम आणि रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स पॉवर या कंपन्या कर्जात आकंठ बुडाल्या आहेत.