मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट गुप्त नव्हती. सामनाच्या मुलाखती संदर्भात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शनिवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या उभयतांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता आहे की काय, अशी शंका बोलून दाखवली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र शिवसेनेतील नेत्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील महाआघाडी सरकार स्थिर असून अजिबात धोका नसल्याचा दावा केला होता. या मुलाखतीचे कारण आता उघड झाले. त्यामुळे गेले काही तास सुरू असलेल्या चर्चा थांबण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षात ही भेट बिहार निवडणुकीच्या निमित्ताने मुलाखत घेण्यासाठी ही भेट झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी फडणवीस यांची इच्छा आहे. अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.
फडणवीस आणि राऊत यांची हाॅटेल ग्रॅड हयातमध्ये दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत ही भेट झाली. या वेळी भाजपकडून किंवा सेनेकडून इतर कोणीही नेते उपस्थित नव्हते. या दोघांमधील चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यातील सध्याचे कटुतेचे संबंध लक्षात घेता हे दोन नेते भेटणे महत्त्वाचे मानले जात आहे.
संजय राऊत हे विविध निमित्ताने मोदी सरकारवर टीका करत असतात. तसेच भाजपचे नेतेही सुशांतसिंह आत्महत्येच्या प्रकरणाच्या निमित्ताने थेट ‘मातोश्री’कडे बोट दाखवत असतात. या वातावरणात या दोन नेत्यांची भेट म्हणजे पुन्हा सलोख्याचे प्रयत्न आहेत की काय, अशी शंका व्यक्त झाली. प्रत्यक्षात मुलाखत घेण्यासाठी ही भेट झाल्याने सरकार पाडण्याचा आणि या भेटीचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.