नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कोमामध्ये होते. दरम्यान, जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
२५ जून पासून त्यांना दिल्लीतील आर्मीच्या आर. अँड आर. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मल्टीऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोमसह सेप्सिस यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी कार्डियक अरेस्ट मुळे त्यांचे निधन झाले. दरम्यान त्यांची कोविड-19 ची चाचणी निगेटीव्ह आली होती. अशी माहिती दिल्लीच्या रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटलमधून देण्यात आली आहे.
भाजपाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. १९९६ ते २००४ यादरम्यान त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्राालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. जसवंत सिंह यांची राजकारण आणि समाजाबाबतच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनासाठी कायम आठवण काढली जाईल. नरेंद्र मोदींप्रमाणेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करत जसवंत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतीय लष्करामधून केली होती. त्यानंतर ते राजकारणात दाखल झाले होते. वाजयपेयी सरकारच्या काळा त्यांची कारकिर्दी शिखरावर होती. दरम्यान, जसवंत सिंह यांनी कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. त्यांनी अनेक वादविवादांचा सामनाही केला. विशेषकरून १९९९ मध्ये कंधार विमान अपहरणावेळी प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी दहशतवाद्याला घेऊन कंधारला गेल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.
मात्र वाजपेयी सरकारमधील त्यांचं महत्त्व कायम राहिलं. पुढे एनडीएचं सरकार गेल्यानंतर जसवंत सिंह यांनी २००९ पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. तसेच गोरखालँडची मागणी करणाऱ्या दार्जिंलिंगमधील स्थानिक पक्षांच्या पाठिंब्यावर ते लोकसभेवर निवडून गेले होते.