मुंबई : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. तिथे त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला आहे.
शरद पवारांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जातोय.”
दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसेच राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सुळे यांनी म्हटलं आहे की, त्या ठिकाणी यूपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे?
महात्मा गांधींचे नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची. रामाचं नाव घ्यायचं आणि कृती नथुरामाची करायची ही भाजपची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली आहे असा जोरदार टोला लगावतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे.
देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
भाजपने ज्या पध्दतीने उत्तर प्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे, नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.