मुंबई : शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदा अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या सावटामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात न घालण्याचा शिवसेनेचा विचार आहे. त्यामुळे विचारांचे सोने मैदानात लुटण्याऐवजी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कसे लुटता येईल, या दृष्टीने शिवसेना तयारी करत असल्याचे बोललं जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
येत्या 25 ऑक्टोबरला दसरा आहे. हा दसरा मेळावा सोशल मीडियाच्या माध्यमातून पार पाडावा. त्यामुळे पक्षाची स्थापनेपासून सुरू असलेली परंपरा खंडित होणार नाही, असा शिवसेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे. दरम्यान यापूर्वी पावसामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा नेमका कसा होणार याकडे शिवसैनिकांसह सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. त्यामुळे हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दसरा मेळावा धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या सोहळ्याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
राज्यात अनलॉक सुरू असले तरी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात आहेत. राज्य सरकारने लोकलसेवा, जिम, सिनेमागृह अजून सुरू केलेली नाहीत. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर राज्यभरातून होणारी गर्दी टाळण्याकडे शिवसेना नेतृत्वाचा कल आहे.