पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्रात देखील यावरून मोठे राजकारण पेटत आहे. भाजपने या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला चांगलंच अडचणीत आणण्याचे शर्थीने प्रयत्न केले. एका बाजूला पार्थ पवार हे सीबीआय चौकशीची मागणी करत असताना आ. रोहित पवार हे मात्र पवारांची आणि राष्ट्रवादीची भूमिका पुढे नेत असल्याचं दाखवत आहेत.
गृहखाते राष्ट्रवादीकडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार याकडे लक्ष लागले होते. विरोधक आणि सुशांतचे चाहते या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेची देशभर चर्चा झाली.
पार्थ पवार यांनी थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागाणी केली. पार्थ यांनी घेतलेली भूमिका भाजपला पूरक अशी असल्याने राष्ट्रवादीची मोठी गोची झाली. मुंबई पोलीस हा तपास करण्यासाठी सक्षम आहेत, असे वारंवार राज्य सरकारकडून सांगण्यात येत असताना पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन आपल्या मागणीचं निवेदन दिलं होतं. सुशांत प्रकरणी योग्य चौकशी व्हावी ही संपूर्ण देशाची आणि विशेषत: तरुणांची भावना आहे. ही भावना विचारात घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी पार्थ यांनी केली होती. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून खरं तर पवार कुटुंबात अंतर्गत कलह निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. याला भविष्यात कोण नेतृत्व करणार या मुख्य प्रश्नाची किनार आहे. वरून कितीही पवार कुटुंब एकसंध आहे, असा दाखविण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही अंतर्गत मतभेद सुशांत प्रकरणाच्या निमित्ताने देखील पुढे आलेच आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळाला पाहिजे ही आम्ही देखील मागणी करत आहोत आणि त्या प्रकरणाला हाताळण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. मात्र यामध्ये भाजपा वारंवार सीबीआय चौकशीची मागणी करून राजकारण करत आहे. त्यामुळे सुशांत सिंहला न्याय द्यायचा आहे त्या न्यायामध्ये अडचण येवू नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं असल्याची भूमिका रोहित पवार यांनी मांडली.
आता सुशांतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचे एम्स हॉस्पिटलने शिक्कामोर्तब केले आहे. यानंतर रोहित पवार यांनी एक ट्वीट केले असून भाजप आणि महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आता नेमकी कोणी कोणी माफी मागावी याबद्दल स्पष्टपणे मागणी केली नसली तरीही रोहित पवार यांनी #सत्यमेवजयते असा हॅशटॅगही जाणीवपूर्वक वापरला आहे. त्यामुळे भाजपसोबतच या ट्वीटमधून रोहित यांनी पार्थ यांना देखील टोला लगावला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात देखील पार्थ विरुद्ध रोहित असं शीतयुद्ध पाहायला मिळाले तरीही आश्चर्य वाटायला नको, असेच राजकीय विश्लेषकातून सांगितले जात आहे.
पार्थ पवार यांचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं चाललंय अशी चर्चा सुरू झाली. माध्यमांनी जेव्हा शरद पवारांना पार्थ यांच्याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी म्हटलं, की तो अपरिपक्व आहे मी त्याला कवडीचीही किंमत देत नाही. या वक्तव्यावरून पवार कुटुंबीयांमधला राजकीय वाद सर्वांसमोर आल्याचं बोललं जाऊ लागलं. पवार कुटुंबीयांमध्ये अनेक बैठका झाल्या. पार्थ यांना शरद पवार यांनी समज दिल्याच्या बातम्या आल्या. यानंतर सुशांत प्रकरणाचा तपास जेव्हा सुप्रीम कोर्टाने सीबीआयला देण्याचा निर्णय दिला होता. त्यावेळी ‘सत्यमेव जयते’ म्हणत पार्थ यांनी ट्वीट करून आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दाखवून दिले होते.