नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या देशभरातील शाळा 15 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्यासंबंधीचे निर्देश यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिले आहेत.
सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा तसेच भौतिक दुरत्वाच्या मानकांचे पालन करीत शालेय शिक्षणासाठी स्वत:ची मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी, असे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही दिले आहेत.
राज्य सरकारांनी राज्यातील स्थिती लक्षात घेत पालकांसोबत चर्चा करून शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता योग्य नियमावली (एसओपी) तयार करण्याचे महत्त्वाची जबाबदारी आता केंद्राकडून राज्यांच्या शिक्षण विभागावर सोपवण्यात आली आहे.
शाळेत विद्यार्थ्यांदरम्यान सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल. वर्गखोली, मैदान, प्रयोगशाळेत पूर्णवेळ मास्क घालावा लागेल. हात स्वच्छ ठेवण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. शाळेत प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान तपासणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थिती संबंधित नियमांमध्ये लवचिकता आणावी लागेल.
कोरोना संसर्गाचा सामूहिक फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे देशभरातील शाळा, महाविद्यालये गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. 1 ऑक्टोबरला देशात ‘अनलॉक-5’ घोषित करण्यात आला. या अनलॉकमध्ये 15 ऑक्टोबरपासून नियंत्रण क्षेत्र वगळता इतर भागातील शाळांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली सरकारने यापूर्वीच 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात कोरोना स्थिती लक्षात घेता आणखी काही राज्य सरकारांकडून अशा प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.