जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपात गटबाजीचे ग्रहण लागल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप नगरसेविकेचा पती व मक्तेदार असलेल्या भाजप पदाधिकारी यांनी चक्क महापौरांच्या दालनात पैशाच्या वादातून एकमेकांना शिवीगाळ करीत ऐकमेकांवर दालनातील खुर्च्या उगारल्याने खळबळ उडाली आहे.
काल गुरुवारी दुपारी दीड ते पावणेदोन वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. महापौर यांच्या स्वीय सहाय्यकांनी मध्यस्थी करीत दोघांना दूर केल्यानतंर हा वाद शमला. भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण यांचे पती तथा महापालिकेतील कर्मचारी बाळासाहेब चव्हाण व भाजपाचे महानगर कार्यकारिणीचे पदाधिकारी भूपेश कुळकर्णी यांच्यात ही चकमक उडाली.
जळगाव महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. पालिकेतील ७५ पैकी एकूण ५७ नगरसेवक भाजपाचे आहेत. असे असताना देखील सुरुवातीपासूनच भाजप नगरसेवकांमध्ये अनेकवेळा गटबाजी उफाळून आली आहे. गुरुवारी महापालिकेत प्रभाग समिती सभापतीपदासाठी निवड प्रकिया पार पडली. ही प्रकीया आटोपल्यानतंर काही नगरसेवक व नगरसेविका हे स्थायी सभापती यांच्या दालनात बसले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी भाजप नगरेविका ज्योती चव्हाण यांचे पती तथा महापालिकेतील कर्मचारी बाळासाहेब चव्हाण व भाजपाचे महानगर कार्यकारणीचे पदाधिकारी भूपेश कुळकर्णी यांच्यात महापौर दालनातच जोरदार बाचाबाची झाल्याने महापालिका इमारतीमध्ये जोरदार खळबळ उडाली. याबाबत भाजपाचे पदाधिकारी भूपेश कुळकर्णी यांना माध्यमांनी विचारले असता, महापालिकेत महापौर यांच्या दालनाबाहेर आपण थांबलेलो असतानाच नगरसेविका ज्योती चव्हाण यांचे पती व मनपा कर्मचारी बाळासाहेब चव्हाण जवळ आले. त्यांनी तू माझ्या वार्डात काम करतो, त्या कामाचा हिशोब करून पैसे दिले नाही, म्हणून वाद घातला. मी त्यांना पैशांचा विषय बोलण्याची ही जागा नसल्याने सांगितले. तरी देखील त्यांनी मला शिवीगाळ केल्याने वाद झाल्याचे सांगितले.
महापौरांच्या दालनात देखील त्यांनी पैशाची मागणी करीत शिवीगाळ सुरूच ठेवली. तसेच दालनातील खुर्ची माझ्यावर उगारून ते अंगावर धावून आले. त्यावेळी महापौरांच्या दालनातील अधिकाऱ्यांनी त्यांना व मला शांत केले. माझी चूक नसताना चव्हाण यांनी शिवीगाळ करीत वाद घातल्याचा आरोप कुळकर्णी यांनी केला.
“हा प्रकार घडला, त्यावेळी मी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासोबत महापालिकेच्या कोविड सेंटरची पाहणी व रुग्णांच्या भेटी घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे नेमके दालनात काय झाले ते माहिती नाही. माहिती घेवूनच यावर बोलता येईल” भारती सोनवणे – महापौर