मुंबई : कोरोनामुळे राज्यातील सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ही सर्व परिस्थिती हाताळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. परिणामी त्यांचा तोल जाऊ लागला आहे. मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. या पत्राला मुख्यमंत्र्यांकडूनही चोख भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या चोख भाषेत ठाकरे शैलीत प्रत्युत्तर दिले. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे त्यांनी राज्यपालांना ठणकावून सांगितले. या मुद्द्यावरुनही किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी खूप मोठी तडजोड केली.
अशातच कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने उद्धव ठाकरे यांना सध्या प्रत्येक गोष्टीचा राग येत आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना त्यांचा तोल गेला. मला मुख्यमंत्र्यांविषयी सहानुभूती आहे. मात्र, राज्यपालांसारख्या वयस्कर व्यक्तीशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अहंकारी भाषेचा वापर करणे, कितपत योग्य आहे, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.
* राज्यपालांना दिलेले उत्तर खेदजनक – फडणवीस
राज्य सरकारने मदिरालये सुरु केली. इतकेच नव्हे तर पर्यटन विभागाच्या पत्राचा आधार घेत वेळही वाढवून दिला. तर मग मंदिरांचे एवढे वावडे का? अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. देशातील सर्व राज्यांनी मंदिरे उघडली. कुठल्याही राज्यात मंदिरे खुली केल्याने कोरोना पसरल्याचे उदाहरण नाही. राज्यपालांना प्राप्त होणारी निवेदने ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्याचप्रमाणे मंदिरे उघडण्यासाठीचे निवेदन पाठवले होते. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर खेदजनक आहे. या तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारी शिवसेना देखील आहे. त्यांच्या राज्यात इतका मोठा अन्याय का?” असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.