मुंबई : राज्यातील मंदिरे सुरू करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील भाषा आणि वक्तव्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात वापरलेली भाषा आणि वक्तव्यावरून नाराजीचा सुर उमटत असतानाच आता काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपालांनी या पत्रातून राज्यघटना आणि मूलभूत तत्वाला हात घातला आहे. त्याचे हे वक्तव्य, भाषा ही घटनेच्या विरोधात आहे असे सांगतानाच त्यांचे हे वक्तव्य राष्ट्रपतींना मान्य आहे का हे विचारावे लागेल असेही थोरात यांनी म्हटले आहे. त्यांनी या मुद्द्यावरून भाजपलाही टोला लगावला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* गोव्यात असे पत्र दिले का?
गोव्यात अशीच स्थिती मग तिथे त्यांनी मंदिर उघडा म्हणून पत्र दिले का ? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी पाडली आहे. त्याचे याबद्दल कौतुक करायला हवे होते परंतु त्यांनी तसे केले नाही. राज्यपाल हे वडीलधारी आहेत, त्यांच्यावर मी व्यक्तिगत टीका करणार नाही,पण त्यांनी काळजी घ्यायला हवी होती. मंदिरात गर्दी खूप असते. त्यामुळे कोरोना आणि त्याचा धोका वाढू शकतो. सरकार म्हणून आम्ही काळजी घेत आहोत, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.