पंढरपूर / सोलापूर : उजनी धरणातून सोडलेले पाणी पंढरपूर मध्ये पोहोचले, त्यामुळे चंद्रभागेला पूर आला आहे. पुराचे पाणी विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर आले असून या परिसरातील नागरिकांना करण्यासाठी वापर करावा लागत आहे. प्रदक्षिणा मार्गावर पुराचे पाणी आहे. यामुळे या परिसरातील नागरिक घरातून बाहेर पडताना होडीने प्रवास करत आहेत.
एनडीआरएफ पथक दाखल झाले आहे असून पथक आणि स्थानिकांच्या मदतीने नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५०० हून अधिक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसानं धुमशान घातलं आहे. पण सोलापूर आणि पंढपुरातल्या पावसाचा जोर काल दुपारपासून काहीसा ओसरला आहे. पण अद्याप पूरस्थिती कायम आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
२००७ नंतर पहिल्यांदाच चंद्रभागेला मोठा पूर आला आहे. दरम्यान नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचले आहे, रस्त्ते पाण्याखाली गेले आहेत आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. चंद्रभागा नदीचे पाणी पंढरपूर शहरात शिरलं असून चंद्रभागेतील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पंढपुरात येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे १७ हजार नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
भीमा नदी २ लाख ८७ क्यूसेक ने सध्या वाहत आहे. तरी पावसामुळे मिसळणाऱ्या पाण्यामुळे साडेतीन लाखांच्या आसपास पाणी पातळी आहे. यामुळे शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, लखुमाई मंदिर, गोविंदपुरा, आंबेडकर नगर, दत्तनगर आधी परिसरामध्ये पुराचे पाणी आले आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये चार ते पाच फूट पाणी आहे. महापुरामुळे पंढरपुर शहर व तालुक्यातील आता पर्यंत ८ हजार ५६० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.