वेळापूर : मळोली (ता. माळशिरस ) येथील पुरोगामी विचारसरणीचे व शेतकरी कामगार पक्षाचे माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते अॅड. जयसिंगराव नारायणराव जाधव यांचे आज शुक्रवारी मळोली येथे अल्पशा आजाराने ८४ व्या वर्षी निधन झाले.
माळशिरस तालुक्याच्या राजकारणात एक वेगळं अस्तित्व ज्यांनी निर्माण केले होते त्या झंजवातापैकी अॅड. जयसिंगराव जाधव हे एक नाव अग्रक्रमाने घेतलं जात होते. मळोलीसारख्या ग्रामीण भागातून आपल्या स्वाभिमानी विचारांचा वारसा घेऊन माळशिरस तालुक्यातील अनेक दिन दलित लोकांची कामे करून त्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे विचार घराघरापर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मळोलीसह सांगोला विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या १४ गावांचे नेतृत्व व त्या गावांचे विकासाचे मुद्दे घेऊन लढणारा एक लढवय्या नेता या नावाने ते परिचित होते. त्यांचा १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. परंतु त्यांनी त्याची लढण्याची उमेद व जिद्द कदापिही सोडली नाही. प्रगत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मळोली,धर्मपुरी, दहीगाव, नेवरे या भागात शिक्षण संस्था चालू करून अनेक विद्यार्थ्यांना त्या काळी शिक्षणाची ज्ञानगंगा दिलेली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते. त्यांच्या निधनाने मळोलीसह माळशिरस तालुक्यात अनेक स्वाभिमानी युवकांची प्रेरणा हरपली असून त्याच शल्य आता कायमस्वरूपी या भागातील नागरिकांना राहणार आहे. मळोली गावाची ग्रामपंचायत अस्तित्वात झाल्यापासून सुमारे ४० वर्षे त्यांनी आपली राजकीय सत्ता अबाधित ठेवली होती.
त्यांच्या निधनाने त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माळशिरस पंचायत समिती चे सदस्य रणजीतसिंह जाधव, सत्यजित जाधव, तीन मुली, सुना, नातवंडे, व सर्व मळोलीकर ग्रामस्थ शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्यावर मळोली येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.