पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विद्यापीठातील सेवक चाळीतील दोघांना, तर एका अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे विद्यापीठातील 4 इमारती 7 दिवसांसाठी सील करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या शिरकावानंतर विद्यापीठात अत्यावश्यक कामांशिवाय कुणीही येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय कर्मचारी, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना ऑनलाईन कामांवर भर देण्यास सांगण्यात आलं आहे.
पुणे विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच विद्यापीठाबाहेरील व्यक्तींना अत्यावश्यक कामाशिवाय परिसरात येऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
* पुण्यात कोरोनाग्रस्त 49 हजार
पुणे शहर आणि जिल्ह्यात काल शनिवारी दिवसभरात 2081 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 48 हजार 953 वर पोहचली आहे. काल दिवसभरात 39 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1282 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे उपचारानंतर बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाणही मोठं आहे. काल शनिवारी दिवसभरात 774 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.