सोलापूर : सोलापूरमध्ये कोरोना बैठकीसाठी निघालेल्या शरद पवार यांनी आज माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकांना वेळ देत भेटीगाठी घेतल्याने मोहिते समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे.
आज सकाळी शरद पवार हे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समवेत बारामती येथून कोरोना बैठकीसाठी सोलापूरला निघाले. या दौरा शासकीय कार्यक्रमात केवळ माळशिरस तालुक्यातील रमेश पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देणार होते. त्याप्रमाणे पवार यांनी सकाळी रमेश पाटील यांच्या निवासस्थानी वाकडी वाट करून जात त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. वास्तविक रमेश पाटील यांचे कुटुंब शरद पवार समर्थक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असून रमेश पाटील हा राष्ट्रवादीचा साधा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.
कण्हेर येथून थेट सोलापूरला जाणार असा समज असताना पवार यांच्या वाहनाचा ताफा माळशिरस मधील मोहिते पाटील विरोधक डॉ. रामदास देशमुख यांच्या घराकडे वळला. येथे मोहिते पाटील यांच्या कट्टर विरोधकांची फौजच पवारांच्या भेटीसाठी थांबली होती. येथे या सर्व नेत्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर पवार सोलापूरला निघाले खरे मात्र पुन्हा वेळापुरात उत्तम जानकर यांच्या निवासस्थानाकडे अचानक गाडी वळवली. या ठिकाणी शरद पवारांनी माळशिरस तालुक्याबाबत उत्तमराव जानकरांनी वीस मिनिटे चर्चा केली.
माळशिरस तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी सुरु केलेल्या धान्यबँकेतून पवारांच्या हस्ते काही महिलांना धान्याचे वाटप करण्यात आल्यावर मग पवारांचा ताफा सोलापूरकडे रवाना झाला. मात्र पवार माळशिरस तालुक्यात असेपर्यंत मोहिते समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता. नेहमी शिवरत्नवर बैठक घेणारे पवार आज चक्क मोहिते विरोधकांच्या शिवतीर्थ आणि गरुड बंगल्यावर थांबल्याने मोहिते समर्थकांत चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना आढावाची बैठक नियोजन भवन, सोलापूर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरु झाली आहे. बैठकीस राजेश टोपे, दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, महापौर, आमदार भारत भालके, प्रणिती शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, राजेंद्र राऊत, बबनराव शिंदे उपस्थित आहेत.