उस्मानाबाद : उस्मानाबादमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर देखील भाष्य केलं आहे. राज्यपाल पद हे देशातील महत्वाच्या पदांपैकी एक आहे. त्या पदाचा मान राखला गेला पाहिजे. तर, राज्यपाल पदासोबतच मुख्यमंत्रीपदाला देखील प्रतिष्ठा असल्याने ती देखील राखली गेली पाहिजे, असं पवार म्हणाले.
राज्यपालांच्या पत्राबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनीच अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याने आता विरोधकांच्या आरोपाला बळ मिळाले आहे. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा सेक्युलर असण्याला इतका विरोध पाहाता, राज्यपाल कोश्यारी यांच्यावर मोठी टीका झाली होती.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…
‘देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यांची जी काही कानउघडणी करायची ती काल केली. त्यांना स्वाभिमान असेल तर त्यांनी या पदावर राहायचं कि नाही हे ठरवावं. जाहीरपणाने केंद्राच्या गृहमंत्र्याने अशी टीका-टिपण्णी करून सुद्धा मी त्या जागेवर बसणार असेल तर ठीक आहे’ असा खोचक टोला देखील त्यांनी राज्यपालांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून ते दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढतील अशी अपेक्षा केली जात आहे.