उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना घरवापसीसाठी काही निकष आहेत. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील नेत्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसची दारं बंद असल्याचं खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान पवारांचे निकटवर्तीय आणि नातेवाईक असलेल्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासंदर्भात बोलताना दिल्या घरी सुखी राहा, अशा शब्दात पवारांनी पाटील कुटुंबाला आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याच स्पष्ट केलं.
डॉ. पद्मसिंह पाटील हे पवारांचे जवळचे नातलग आहेत. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपप्रवेश पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. राणा जगजितसिंह हे अजित पवारांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा होती. मात्र खा. पवारांच्या आजच्या विधानाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
फेसबुक पेजसह ‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…
भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी उस्मानाबादच्या पाटील परिवाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील अनेक नेते जे राष्ट्रवादी सोडून गेले, ते परत राष्ट्रवादीत येऊ इच्छित असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता पवार यांनी काही भागातील नेत्यांबाबत पक्षानं निर्णय घेतला आहे. त्यात उस्मानाबादच्या नेत्यांचं नाव न घेता त्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचं पवारांनी जाहीर केलं.
उस्मानाबादचे नेते पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांसोबत होते. शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून आजवर त्यांची ओळख होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं पवार आणि पाटील यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे.
* कोप-यापासून हात जोडले
पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहे. त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय. परंतु, काहींच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतलाय. आता त्यांना पुन्हा घेणे नाही. ‘गेलात तिथे सुखी रहा’, असे सांगतोय़ उस्मानाबादच्या बाबतीत हाच निर्णय घेतल्याचे सांगून पद्मसिंह यांच्या कुटूंबास आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचे पवार यांनी त्यांचे नाव न घेता सांगितले. शिवाय डॉ. पाटील यांचे नाव निघताच त्यांनी कोपरापासून हात जोडले.
* शरद पवार संतापले होते
यापूर्वी शरद पवार यांना जवळच्या नात्यातील लोक पक्ष सोडून जात असल्याबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना पवार चांगलेच भडकले होते. अहमदनगरच्या श्रीरामपूर इथं पत्रकार परिषदेत बोलताना नेते पक्ष सोडून जात आहेत, कार्यकर्ते नाही, असं पवार म्हणाले. त्यावर एका पत्रकाराने आपले नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील पक्ष सोडत असल्याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा नातेवाईक आणि राजकारण याचा संबंध नाही, असं म्हणत पवार चांगलेत संतापले होते. त्यांनी प्रश्न विचारणा-या पत्रकारास माफी मागवयास सांगितले होते.