मुंबई : ‘इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेणू पारिख हिने करोनावर यशस्वी मात केली आहे. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून पुढील काही दिवस ती घरीच क्वारंटाइनमध्ये राहणार आहे. डिस्चार्ज मिळाल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत श्रेणूने चाहत्यांचे आभार मानले आहेत. याचसोबत श्रेणूच्या तब्येतीची पूर्णपणे काळजी घेणाऱ्या डॉक्टर व नर्सेसचेही तिने आभार मानले.
श्रेणू छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘भ्रम…सर्वगुण संपन्न’ या मालिकेतून तिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘इश्कबाज’, ‘इस प्यार को क्या नाम दू’, ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘ब्याह हमारी बहु’ या मालिकांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
‘माझ्यावर इतक्या प्रेमाचा व प्रार्थनाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे मी कसे आभार मानू मला समजत नाहीये. देवाच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेने मी बरी होत असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता मी माझ्या घरी संपूर्ण विलगीकरणात राहणार आहे. रुग्णालयातील करोना योद्धांची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मी खूप आभारी आहे’, असं तिने लिहिलं.