मुंबई : भाजपा नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले होते, त्यानंतर आता खुद्द एकनाथ खडसेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत दिलेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका केली होती, याला एकनाथ खडसेंनी पाठिंबा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. 22 तारखेला त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे. पण, राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधीच एकनाथ खडसे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देशाला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी कोरोनाची परिस्थिती अजून टळली नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
‘आपल्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र, यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला’ अशी टीका करणारे ट्वीट जयंत पाटील यांनी केले होते.
एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचे ट्वीट हे रिट्वीट केले आहे. एकाप्रकारे जयंत पाटील यांच्या टीकेचं एकनाथ खडसे यांनी समर्थन केले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राष्ट्रवादीवासी झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
मात्र, अजूनही भाजप नेत्यांकडून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जातील याबद्दल खंडन करण्यात आले आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसे हे भाजप सोडून जाणार नाही, असा दावा केला आहे. तर पंकजा मुंडे यांनीही एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये, असं म्हटलं आहे. पण, जळगावात खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेशासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे
* तासाभरातच रिट्वीट डीलीट
एकनाथ खडसे यांनी ट्वीट रिट्वीट करून एकच खळबळ उडवून दिली. पण, तासाभरातच त्यांनी माघारही घेतली. ही बातमी सर्वत्र पसरताच एकनाथ खडसे यांनी अवघ्या तासाभरात माघार घेतली. जयंत पाटील यांचे रिट्वीट केलेले ट्वीट हे खडसे यांनी डिलीट करून टाकले आहे. ट्वीट डिलीट करून खडसे यांनी या वादावर तुर्तास पडदा टाकला आहे. पण, राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा मात्र अजूनही सुरूच आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, नाराज होणे, पुन्हा नॉर्मल होणे’ ही सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. व्यक्ती नॉर्मल झाल्यावर पुन्हा नाराज होणार नाही, असे कधीच नसतं. त्यामुळे भाजपचे नेते एकनाथ खडसे आता जरी नाराज असले तरी त्यांच्याबरोबर बोलणं सुरु आहे. त्यांची नाराजी दूर होईल. ते कुठेही जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.