सोलापूर : जिल्ह्यात सीना, भीमा, बोरी, भोगावती नदीला आलेल्या महापुरात ३८० जनावरे वाहून गेली आहेत. तसेच १४ हजार १७१ कोंबड्या बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांनी दिली.
जिल्ह्यात १३ आॅक्टोबरपासून वादळी वा-यासह झालेला पाऊस आणि त्यानंतर नद्यांना आलेल्या महापुराचा तडाखा जसा शेतीला बसला तसा पशुधनाही बसला आहे. यामध्ये ११ तालुक्यातील ८४ गावांमधील जनावरे वाहून गेली तर काही जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पूरबाधित गावात असलेल्या जनावरांना न्यूमोनिया, लाळखुरकत आणि घटसर्प साथीचा धोका आहे. त्यामुळे या गावांमध्ये तातडीने पथके पाठविण्यात आली आहेत. १ लाख १० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.
वीज पडून मेलेल्या जनावरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. वाहून गेलेल्या जनावरांची माहिती तलाठी, सरपंच, पोलीस पाटील यांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे. जनावरांची संख्या मोठी असली तरी किंमत ठरलेली नाही. प्रत्येक जनावरांची बाजारभावाप्रमाणे व त्यांच्या वयोमानाप्रमाणे किंमत असते. त्यामुळे महसूल विभाग कोणत्या जनावराला किती भरपाई द्यायची याबाबत निर्णय घेत असल्याने फक्त आकडेवारी कळविल्याचे नरळे यांनी माध्यामास सांगितले.
* वाहून गेलेल्या पशुधनांचे वर्गीकरण
गाई :१२९, बैल:८, वासरे: ४१, म्हैस: ४६, रेडके: ११, शेळ्या: १४४, करडे: ११, घोडा :१ आणि
कोंबड्या: १४ हजार १७१ अशी संख्या आहे.
बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथील एका शेतक-याचा घोडा, महाळुंग येथील २ हजार ५००, होटगी: १ हजार, शिरशी: ९००, कदमवाडी: १००, शेंडचिंच: १५, उंबरे दहिगाव : १४0, पळस:१४०, बांगडे:२०, डिकसळ:१५०, कामती:४०, साबळेवाडी:४०,नरखेड:१३१, सुस्ते:२० आणि गुरसाळेतील १५ कोंबड्या बेपत्ता झाल्या आहेत.