मुंबई : कोरोनाच्या काळातही सातत्यानं कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी थकवा जाणवत असल्यानं त्यांनी काही दिवस घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार होम क्वारंटाइन झाल्याचं समजताच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी या अफवांचे खंडन केले आहे.
अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. ताप असल्यानं खबरदारी म्हणून त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, थकव्यामुळं त्यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व नियोजित कार्यक्रम व बैठका रद्द केल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाची साथ व त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात अजित पवार सातत्यानं काम करताना दिसत होते. लॉकडाऊनच्या काळातही मंत्रालयात त्यांची उपस्थिती असायची. अनेक बैठका सुरू होत्या. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने ते सर्व प्रकारची काळजी घेत होते. भेटीगाठीच्या दरम्यान पुरेसे अंतर असावे म्हणून त्यांनी आपल्या कार्यालयातील टेबलाभोवती काचा लावून घेतल्या होत्या.
नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसानं केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणचा दौराही केला. काही भागांतील पिकांची पाहणी करून ते घरी परतले होते. त्यानंतर ताप जाणवत असल्यानं त्यांची तपासणी करण्यात आली होती.