मुंबई : “मी माझा जीव धोक्यात घालून मराठा समाजासाठी फिरत आहे. सरकारला काय बोलायचं? काय सांगायचं? मी आता बोलून बोलून थकलो आहे. सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत, एवढीच माझी विनंती आहे. मी थकून गेलो आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षण स्थगितीवरील सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी सुनावणी सुरु आहे. परंतु, थोड्या वेळासाठी ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्याची मागणी आहे. आज ही सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुरु झाली. त्यातच महाराष्ट्र सरकारचे वकील मुकूल रोहतगी हेही गैरहजर असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने थोड्यावेळासाठी ही सुनावणी तहकूब केली.
याचिकाकर्त्यांनी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे याची सुनावणीसाठी परवानगी दिली होती.
* उपसमितीची मिटिंग झाली नाही
मी काल, परवा, अनेक दिवसांपासून बोलतोय की फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित होणं गरजेच आहे. मी हे देखील सांगितले होते की सामान्य डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या सचिवांना कोऑर्डिनेट करायला सांगा, माझं अशोक चव्हाणांशी दोन दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं की उपसमितीची मिटिंग लावा, पण ती मिटिंगही झालेली दिसत नाही. त्याचंच मला आश्चर्य वाटतंय,” असेही संभाजीराजेंनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सरकारी वकिलावर पूर्ण विश्वास
“सरकारी वकील कुठे आहेत? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून केला जातो आणि तिथे वकील उपस्थित नसतात हे दुर्देव आहे. गंभीर आहे. त्यामुळे अशोकराव जिथे कुठे असतील त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करा,” अशी विनंती संभाजीराजेंनी केली. “मराठा समाजाला तुम्ही अशा पद्धतीने गृहित का धरायला लागले आहेत का? त्यांच्याशी खेळखंडोबा करायला लागले आहेत. हे बरोबर नाही. माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की सर्वोच्च न्यायालयात समाजाचं आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी जी केस सुरु आहे तिथे वकिलांना पोहोचावं. आमचा वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, त्याबद्दल काहीही दुमत नाही. पण आपली बाजू तिथे मांडणं महत्त्वाचं आहे,” असेही त्यांनी यावेळी म्हटलं.
* मॅसेज चुकीचा जाईल
मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्या. त्यातील बारकावे समजून घ्या हे, मी सरकारला नेहमी सांगितलं आहे. जे कोणी सामान्य विभागाचे जे कोणी सचिव असतील त्यांनी याचा फॉलोअप घेणं गरजेचे आहे. काही तरी तांत्रिक घोळ झाला आहे, असे माझ्या कानावर आले आहे. पण त्यातही आपल्याकडे वेळ आहे. आपण दुरस्ती करु शकतो. जर पुढच्या सुनावणीत कोणी हजर राहिलं नाही तर हा मॅसेज चुकीचा जाईल. त्यामुळे सरकाराला माझी विनंती पूर्वक सूचना आहे की ताबडतोब जी चूक झाली ती दुरुस्त करा,” अशी कळकळीची विनंतीही त्यांनी राज्य सरकारला केली.