सोलापूर : मागील तीन महिन्यापासून एसटी सेवा सुरु झाल्यानंतर देखील एसटी खात्याकडून कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळालेच नाही. काम चालू पण वेतन नाही अशा स्थितीत दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. वेतन नाही तर दिवाळीचा सण कसा साजरा करावा या चिंतेत सापडलेले एसटी कामगार व कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
सोलापूर विभागात एकूण कर्मचारी 4 हजार 200 कर्मचारी आहेत. महिन्याचे वेतन 10 कोटी रुपये थकित आहे. तीन महिन्याचे एकूण थकीत वेतन 30 कोटी रुपये आहे. तर राज्यातील कर्मचाऱ्याचे वेतन 250 कोटी रुपये थकित असल्याचे समोर आले आहे.
प्रवाशी सेवा बंद असली तरी या कर्मचाऱ्यांनी कोरोना संकटात वाहतूक करून ही सेवा बजावली. तसेच माल वाहतुकीच्या व्यवसायात उतरून उत्पन्न वाढीचे प्रयत्न केले. कोरोना लॉकडाउन नंतर एसटी सेवा सुरू झाल्या. आंतरजिल्हा व नंतर बाहेरील जिल्ह्यासाठी एसटी गाड्या सुरू झाल्या आहेत. पण प्रवाशांचा प्रतिसाद आता वाढत चालला आहे. सर्वत्र वाहतूक सुरु झाल्याने एसटीचे चालक, वाहक व कर्मचारी देखील कामाला लागले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कामे सुरू झाल्यानंतर मागील तीन महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. दसऱ्याचा सण विना वेतनाचा साजरा करण्याची वेळ या कामगारावर आली. त्यानंतर आता पंधरा दिवसावर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे वेतनासाठी कर्मचारी व कामगार आक्रमक झाले आहेत. दरम्यान, या प्रश्नावर आता एसटी कामगार संघटनेने आंदोलनाची तयारी केली आहे.