सोलापूर : कोजागरी (अश्विन) ते त्रिपुरारी (कार्तिकी) पौर्णिमेपर्यंत प्रत्येक मंदिरात काकडारती करण्याची वारकरी परंपरा आहे. ती जपण्यासाठी मंदिरे उघडून काकड्यासह भजन कीर्तनास परवानगी देण्याच्या मागणीसाठी अखिल भाविक वारकरी संप्रदायिक मंडळाच्या वतीने आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.
वारकरी भाविकांनी चैत्रवारी, आषाढवारी, रामनवमी, कृष्णाष्टमी, हनुमानजयंती, श्रावण व अधिक मास, गणेशोत्सव व नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक विधी भजन कीर्तन आपापल्या घरीच केले. परंतु सध्या कोरोना रुग्णांचे घटते प्रमाण लक्षात घेऊन सर्व क्षेत्रे अनलॉक केली जात असताना मंदिरानाही अनलॉक करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
वारकरी परंपरेत काकडीरतीला विशेष महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून काकडारतीला सुरवात होत असल्याने सर्व मंदिरातून अटी व नियम घालून काकडा आरती करण्यासाठी परवानगी द्यावी तसेच भजन व कीर्तनास टप्प्याटप्प्याने परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. यामध्ये राज्य सदस्य अभिमन्यु महाराज डोंगरे, जिल्हाध्यक्ष ज्योतिराम महाराज चांगभले, जिल्हा सचिव मोहन महाराज शेळके, शहराध्यक्ष संजय महाराज पवार, शहर संघटक कुमार महाराज गायकवाड, शहर समन्वयक संजय महाराज केसरे, युवा समिती जिल्हा कोषाध्यक्ष अविनाश महाराज पवार, युवा समिती शहर प्रसिद्धी प्रमुख शिवानंद महाराज जाधव महाराज, कृष्णदेव महाराज बेलेराव, बजरंग महाराज डांगे, सचिन महाराज भोसले, आदर्श महाराज इंगळे, कृष्णा महाराज चवरे यांची उपस्थिती होती.
“महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा खुल्या आहेत. दुकाने खुली आहेत. दारूचे दुकान मोठ्या प्रमाणामध्ये सुरु आहेत. सुरू करायचं काही शिल्लक राहिलेले नाही. नेते मंडळीने दसरा मेळावे साजरे केले. आम्हाला काकड आरतीला का बंदी करण्यात येत आहे, असा प्रश्न आमच्यासमोर भाविकांना आहे. आता आम्ही सोलापूर येथे आंदोलन केले. परवानगी नाही मिळाली तर आम्ही मुंबई येथील आझाद मैदानावर पुढचे आंदोलन करणार आहे”
सुधाकर महाराज इंगळे – राष्ट्रीय अध्यक्ष, वारकरी मंडळ