मुंबई : भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधल्या दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटानंतर भूमीने मागे वळून पाहिलं नाही. ती नुकतीच ‘डॉली किट्टी चमकते सितारे’ या चित्रपटात झळकली.
या चित्रपटाचं समीक्षकांकडून फार कौतुक झालं. त्यानंतर तिने अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलं. मात्र तिचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. तिने एका मुलाखतीदरम्यान काही मनाल हेलावून टाकणारे खुलासे केले आहेत.
अभिनय क्षेत्रात येण्यासाठी भूमी १३ लाख रुपयांचं कर्ज काढून फिल्म स्कूलमध्ये दाखल झाली होती. मात्र नंतर तिला या स्कूलमधूनही काढून टाकण्यात आलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भूमीने याविषयी खुलासा केला.
‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत भूमीने सांगितलं, “मला अभिनेत्री व्हायचंय हे माझ्या आई-वडिलांना खूप समजावून सांगावं लागलं. माझ्या या निर्णयाने ते खूश नव्हते. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होती आणि फिल्म स्कूलमध्ये अॅडमिशन घेतलं. त्या स्कूलची फी खूप जास्त होती. त्यासाठी मी १३ लाख रुपयांचं कर्ज काढलं होतं.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फिल्म स्कूलमधील अनुभवाविषयी ती पुढे म्हणाली, “मी नापास झाले कारण मी चांगली अभिनेत्री नव्हते म्हणून नाही तर मला शिस्त नव्हती म्हणून. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.
माझ्या डोक्यावर १३ लाख रुपयांचं कर्ज होतं आणि मला स्कूलमधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर मी नोकरीच्या शोधात होते आणि तेव्हा यशराज फिल्म्समध्ये मला कास्टिंग अस्टिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. त्यादरम्यानच मला दम लगा के हैशा या चित्रपटासाठी ऑडिशन द्यायची संधी मिळाली.