मुंबई : मुंबईत बेस्टच्या मदतीला आलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगराचे वाहक भगवान विठ्ठल गावडे (वय 48) यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. मूळव्याधीचा त्रास असलेल्या गावडे यांची गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती खालावली होती.
एसटीचे वाहतूक नियंत्रक एन. के. जाधव आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे उपचार मिळावा म्हणून तक्रार केली. मात्र वेळेवर दखल न घेतल्याने परिणामी उपचाराविनाच जीव गमवावा लागला आहे. मात्र, अद्याप गावडे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
मुंबईतील रस्त्यावरील प्रवाशांची कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमामध्ये एसटीचे 1000 गाड्या सेवेत आल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय व्हावी, यासाठी ओयो हॉटेल कंपनीला कंत्राट दिले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांकडून जेवणाचा दर्जा नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. तरी सुद्धा एसटीने त्याची दखल घेतली नाही.
कर्मचारी आजारी असले तरी सुद्धा एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाकडून जबरदस्तीने मुंबई पाठवल्या जात आहे. यामध्ये जर कर्मचाऱ्यांना कोणत्या आजाराच्या व्याधी असेल त्याची सुद्धा दखल घेतली जात नाही. उलट आगार व्यवस्थापक निलंबनाची कारवाई करण्याची धमकी दिली जात असल्याने नाईलाजास्तव मुंबई मध्ये यावे लागले.
सोलापूर विभागातील 48 कर्मचारी मुंबईत बेस्ट उपक्रमात प्रवासी सेवा देण्यासाठी 26 ऑक्टोबर रोजी दाखल झाले होते. त्यामध्ये मंगळवेढा डेपोच्या भगवान गावडे यांना समावेश होता. गावडे यांना पूर्वीपासून मुळव्याधीचा त्रास असतानाही मंगळवेढा आगार व्यवस्थापकाने त्यांना जबरदस्तीने मुंबईत कर्तव्यावर पाठवले होते. दरम्यान प्रतीक्षा नगर ते बोरिवली कर्तव्यावर कामगिरी बजावत असताना गेल्या तीन दिवसांपासून गावडे यांचा आजार वाढत गेला. संबंधित एसटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आजाराची कोणतीही दखल घेतली नसल्याने अखेर गावडेना आपला जीव गमवावा लागला आहे.
गावडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला कुर्ला येथील भाभा हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे. तर या घटनेची कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे.