सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उठसूट कोणीही टीका करत आहे. पण टीका करणाऱ्या बहाद्दरांनी, ते पवार साहेबांच्या तालमीत धडे घेत आहे हेही लक्षात घ्यायला हवे. पवार साहेब म्हणजे ‘तेल लावलेला पहिलवान’ (जो आजतागायत कोणाच्याही हाताला लागला नाही) हे सर्वश्रुत आहे. ज्यांनी ज्यांनी पवार साहेब यांच्याबरोबर (राजकीय) कुस्ती केली त्यांना साहेबांनी कायमचा कात्रजचा घाट दाखविला आहे. साहेबांचा ‘कात्रजचा घाट’ म्हणजे काय हे त्यांना चांगलेच माहित आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 18 आमदार सोडून गेले असताना पुन्हा 54 आमदार निवडून आणणारी व्यक्ती म्हणजे साहेब होय. भल्याभल्यांची भंबेरी उडविणारी ईडी विरोधकांनी मागे लावली, पण त्यांनाही कात्रजचा घाट दाखविणारा एकमेव राजकारणी म्हणजे साहेब होय. विरोधकांचे 105 आमदार निवडून येऊनही त्यांना विरोधात बसायला लावणारे दुसरे तिसरे कोणी नसून साहेबच होय. ज्यांनी ज्यांनी आव्हान दिले ते आज चित्रात कुठे दिसतात का?. ज्या माजी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले पवार यांचे राजकारण संपले आहे. त्यांचा इरा आता संपुष्टात आला आहे. ते आज कुठे आहेत? त्यांना पवार साहेब यांचा कात्रजचा घाट म्हणजे काय ते जाऊन विचारा?..ज्या व्यक्तीने असाध्य आजारालाही परतावून लावले, त्यांना तुमच्यासारखे पोकळ धमक्या देणारे काय आव्हान देणार.
साहेबांनी हजारो संस्था निर्माण केल्या आहेत. त्या संस्थावरती आज लाखो लोकांचे संसार चालतात. ज्यांनी कधीही एक संस्था निर्माण केली नाही, साधा एक माणूस उभा केला नाही, ते शेंबडं पोर उठून साहेबांवरती टीकाटिप्पणी करते. टीका करतात. पवार साहेब यांचे राजकारण कळायला फक्त मेंदू असून, उपयोगाचे नाही. त्याला 50 वर्षांच्या राजकारणाच्या अनुभवाची शिदोरी पण हवी. साहेबांनी टाकलेली फिरकी कळायला तुम्हाला राजकारणातलं भीष्म पितामह असायला हवं, तरच ती कळेल. आणि आजच्या घडीला असा भीष्म पितामह राजकारणात एकच आहे, तो म्हणजे खुद्द पवार साहेब. त्यांच्या राजकीय चाली कळायला दहा जन्म घ्यावे लागतील. तेव्हाही त्या कळतील म्हणून जरा शंकाच आहे. कुठल्याही प्रसंगात साहेब हिमालयाप्रमाणे निश्चल असतात. त्यांच्या राजकारणाच्या चालीही त्यांच्या शांत व्यक्तिमत्वाला आणखीनच गूढ बनवतात. म्हणूनच अनेकदा ते काय करतील याचा थांग जवळच्याला तर सोडाच घरातल्या व्यक्तींनाही लागत नाही.
दरम्यान, 1977 मध्ये वसंतदादांचे सरकार पाडण्याच्या प्रसंगातही त्यांनी या कानाचे त्या कानालाही कळू दिले नव्हते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1991 मध्ये छगन भुजबळांसह बारा आमदारांना त्यांनी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आणले. शिवसेनेला फार मोठा धक्का देण्याचे काम त्यांनी त्यावेऴी केले. अर्थातच त्यावेळी शिवसेना या कृत्याने चवताळली. पण काही करू शकली नाही. आजही भुजबळ साहेबांसोबतच आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
साहेब एखाद्या चालीत झालेला पराभव लक्षात ठेवून दुसऱ्या वेळी त्यात यश कसे मिळेल ते पहातात. त्यासाठी योग्य अभ्यासही करतात. हार झाल्यावर सगळं सोडून देऊन शांत बसतील ते साहेब कसले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद (BCCI) हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जगमोहन दालमिया यांनी पहिल्यांदा त्यांचा 1 मताने पराभव केल्यानंतर, दुसऱ्यांदा मात्र साहेबांनी एवढ्या हुशारीने जाळे विणले की दालमिया यांच्यासारखा मुरब्बीही त्यात अडकला. गो. रा. खैरनार, जगमोहन दालमिया यांची पाने जरा चाळा म्हणजे साहेब आणि कोंडीत सापडलेला व्यक्ती काय आहे ते कळेल.
साहेबांचा कुठल्या क्षेत्राचा अभ्यास नाही असे एक क्षेत्र दाखवा. राजकारण, क्रीडा, साहीत्य, कला, नाट्य, उद्योग, इतिहास, विज्ञान, शेती, अर्थव्यवस्था कुठल्याही क्षेत्राचे नाव घ्या, त्या क्षेत्राला कोळून पिलेला व्यक्ती म्हणजे पवार साहेब. अहो, देशात कुठे काही आपत्ती आली की, पहिली आठवण येते ती साहेबांची. ते मग युद्ध असो वा भूकंप (उदा. किल्लारी), 1993 चे बॉम्ब ब्लास्ट असो, विरोधी पक्षांनाही अशा संकंटसमयी तेच आठवतात. हिमालयाच्या मदतीला धावणारा, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नंतरचे ते खरे सहयाद्रीचा कणा आहेत. वय वर्ष 80. पायाला झालेल्या जखमेने चालता येत नाही. पायाला मोठी जखम आहे, तरीदेखील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मायबाप शेतकऱ्यांना दिलासा द्यायला बांधावर जायला पवार साहेबच असावे लागते, ते कुठल्या ऐऱ्या-गैऱ्याचे काम नाही.
मला वाटते, खरं तर सर्व राजकारण्यांनी माणसं जोडण्याची कला पवार साहेब यांच्याकडून शिकावी. कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू राहू शकत नाही. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे तर याचे मोठं उदाहरण आहे. अनेक विरोधी पक्षातील लोक त्यांचे मित्र आहे. उदा. देशाचे सध्याचे पंतप्रधान म्हणूनच म्हणतात, ‘मी त्यांचे बोट धरून राजकारणात आलो आहे.’ हे कशाचे द्योतक आहे? आत्ताचेच जवळचे उदाहरण घ्यायचे तर एकनाथ खडसे. ज्या व्यक्तीने गेली 40 वर्षे साहेबांना कायम विरोध केला, पण आज साहेबच त्यांचा आधारवड बनले आहेत. त्यांनाही साहेबांनी जवळ केले. हे फक्त साहेबांनाच जमू शकते. यावरून समजून घ्या साहेब कशा रीतीनं शत्रुलाही आपलेसे करतात. साहेब यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर देशाच्या राजकारणात महत्वाची आहे.
आणि अशाच अष्टपैलू, राजकारणातले चाणक्य असणाऱ्या पवार साहेबांच्या तालमीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे धडे गिरवत आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्यावर टीका करत असाल तर जपून करा, नाहीतर तुमचा राजकीय ‘गेम’ होणार हेही तितकेच खरे आहे. कारण त्यांची शिकवणी पवार साहेब यांच्याकडे सुरू आहे.
– सागर डी. शेलार (8262049634)