मुंबई : जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं आज निधन झालं आहे. अंबरनाथ येथील खाजगी रुग्णालयात सोमवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंडित दिनकर पणशीकर हे नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे धाकटे बंधू होते. 1936 साली त्यांचा जन्म झाला. घरामध्येच कलेचं वातावरण असल्यामुळे त्यांचा ओढाही कलेकडेच होता. सुरुवातीच्या काळात गुजरातमध्ये दत्तात्रय कुंटे यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले. त्यानंतर दिनकर पणशीकरांनी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून तब्बल 10 वर्ष शिक्षण घेतलं आणि जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शास्त्रीय गायक असलेल्या पणाशीकरांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातही भूमिका केली होती. ‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या 200 बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो. गोवा कला अकादमीचे ते ‘संगीत विभाग प्रमुख’ होते. शेकडो शिष्य त्यांनी घडवले.
गोवा राज्य पुरस्कार, कोलकाता संगीत रिसर्च अकादमी पुरस्कारासह षडाक्षरी गवई, गानवर्धन, चतुरंग संगीत कला पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2017 साली केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे त्यांना पाठ्यवृत्ती, फिलोशीप प्रदान केली होती.