जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला मोठा हादरा दिला आहे. महाजनांच्या मतदारसंघातील दोन बसेस भरून जवळपास 250 कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले आहे.
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर आता अधिक आक्रमकपणे मैदानात उतरले आहे. आता त्यांनी भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या गडावर हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची मोठी फौजच खडसेंनी राष्ट्रवादीत आणली आहे.
जामनेरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोन बसेसद्वारे आलेल्या 250 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे तर भाजपला मोठी गळती लागली आहे.
काल सोमवारीसुद्धा जळगाव जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
* अहमदनगरमध्येही भाजपला गळती
अहमदनगरमध्येही भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढंच नाहीतर श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अहमदनगर जिल्ह्यात भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये भाजपातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून पुढील काळात ते राष्ट्रवादीमध्ये येतील, असा दावाही केला आहे.