भोपाळ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नसून भगवान रामाच्या विरोधात आहे, अशी टीका भाजप नेत्या उमा भारती यांनी केली. पवारांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता.
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार काल रविवारी सोलापूर दौ-यावर आले होते. याचवेळी श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाची तारीख ठरली. यावर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. तेव्हा शरद पवारांनी कोरोना उपाय योजनेला प्राधान्य दिले पाहिजे, मंदिर बांधल्याने कोरोना जाणार असल्याचं त्यांना वाटत असेल, मला माहित नाही, असा टोला पंतप्रधान मोदींना लगावला होता.
यावर काल पासून विरोधकांकडून शरद पवारांवर टीका होत आहे. आता उमा भारती यांनीही शरद पवार हे रामद्रोही असल्याचे म्हटले. शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही आहे. ते पंतप्रधान मोदींच्या विरोधात नसून भगवान राम यांच्याविरोधात आहे. असं उमा भारती म्हणाल्या. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी गणपतीची पूजा करण्यासाठी त्या भोपाळमधील प्राचीन गणेश मंदिरात गेल्या होत्या.
“आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असा टोला लगावत पवारांनी मोदी सरकारला आर्थिक नुकसानाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा सल्ला काल सोलापूर दौऱ्यात दिला होता.
* ट्विटरवर ट्रेंड
शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडल्याचे चित्र आहे. पवार समर्थकांनी शरद पवार यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. तर काही जणांनी पवारांच्या वक्तव्यावर टीकाही केली आहे. त्यानंतर #SharadPawar काही काळ ट्विटरवर ट्रेंडमध्ये होतोय.