मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यापासून ते केंद्रातील भाजपा नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी टीकेला उत्तर दिलं असून अर्णब गोस्वामीच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“अर्णब गोस्वामीच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काही संबंध नसून आत्महत्येप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. एका खुनी माणसाला वाचवायचं काम भाजपा करत आहे. गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चालला म्हणून ओरडायचं. सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचं नाव होतं, नाईक कुटुंबीय कोर्टात गेले होते, त्यानंतर त्यांना तपासाची परवानगी दिली,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“भाजपा असं ओरडतंय जणू काही तो पक्षाचा कार्यकर्ता आहे. यामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रश्न कुठे येतो, सुडबुद्धीनं कारवाई करण्यात आलेला आरोप चुकीचा असून अर्णब गोस्वामीला भाजप नेते का वाचवत आहेत?,” अशी विचारणा अनिल परब यांनी केली आहे. “अर्णब गोस्वामी यांना गुन्हेगार म्हणून अटक केलेली नाही, त्यांना तपासासाठी घेतलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
“एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलं, त्याला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे, त्यांच्यात त्यांचा जीव अडकला आहे का? महाविकासआघाडीबाबत एवढी लोकं बोलतं आहेत, पण त्यांना आम्ही आत टाकत नाही. अर्णब यांच्या तोंडातून काही नावं बाहेर पडतील अशी भाजपला भीती आहे,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. “कोर्टाच्या आदेशाने प्रकरणाचा नव्याने तपास सुरु असून राज्यात पोलिसांचं राज्य असून त्यांचंच राज्य राहील,” असंही यावेळी ते म्हणाले.