बार्शी : आपल्या शिक्षणसंस्थेत कार्यरत असलेल्या चार शिक्षकांचा 38,82,518 रुपये थकित पगार हडपल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील अरोपी संस्थाचालक बाळासाहेब नरहरी कोरके व जामगाव माध्यमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक पांडुरंग महादेव कानगुडे यांचा चार अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायलयाने फेटाळले. या दोघांविरोधात माढा पोलिस ठाण्यात फसवणुकीबाबत चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये अटक टाळण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सरकारच्यावतीने ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.
बार्शी तालुक्यातील सर्जापूर येथील जय जगदंबा बहुउद्देशीय संस्थेची माढा तालुक्यातील जामगाव येथे माध्यमिक आश्रमशाळा आहे. या संस्थेचे सचिव बाळासाहेब कोरके असून आश्रमशाळेचा मुख्याध्यापक पांडुरंग कानगुडे आहेत. सदरच्या आश्रमशाळेला समाजकल्याण विभागाच्यावतीने अनुदान मिळते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या आश्रमशाळेतील हनुमंत क्षीरसागर, हरी पोटभरे, शिवाजी घुगे, समाधान हजारे या चार शिक्षकांना जून 2010 ते एप्रिल 2013 दरम्यानचा पगार मिळाला नव्हता. त्याबाबत त्यांनी समाजकल्याण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर चौघांचा थकित पगार एकत्रितरित्या 38,82,518 रुपये आश्रमशाळेच्या बँक खात्यावर 16 डिसेंबर 2013 रोजी जमा करण्यात आला असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यामुळे त्यांनी बँकेकडे चौकशी केली असता या 38 लाखातील पांडुरंग कानगुडे याने स्वत: 10 लाख रुपये काढून घेतले तर उर्वरीत रक्कम त्याने बाळासाहेब कोरके याच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडे वारंवार मागूनही त्यांनी पैसे न दिल्याने शिक्षकांनी अखेर पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे.