सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी व महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने आज महाराष्ट्रासाठी पहिल्या टप्प्यातील 2 हजार 297 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याला 294 कोटी 81 लाख 22 हजार रुपये मिळाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात शासनाची मिळालेली मदत ही अत्यंत तोकडी मानली जात आहे. मनुष्य हानी, जखमी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णता क्षतिग्रस्त झाले असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी आणि वस्तुंकरिता अर्थ सहाय्य म्हणून 13 कोटी 44 लाख रुपये देण्यात आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मृत जनावरांसाठी तीन कोटी तीन लाख 53 हजार रुपयांची मदत सोलापूर जिल्ह्याला मिळाली आहे.
पूर्णत: नष्ट किंवा अंशत: शेतात पडझड झालेली कच्ची आणि पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्यासाठी सात कोटी 5 लाख 12 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. शेतीच्या नुकसानीसाठी अर्थ सहाय्य म्हणून 20 कोटी 56 लाख 51 हजार रुपये मिळाले आहेत.
शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीची मदत म्हणून एसडीआरएफच्या 6 हजार 800 रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्टर मदत म्हणून 174 कोटी रुपये सोलापूर जिल्ह्याला मिळाले आहेत. वाढीव दराने शेतीपिकासाठी 3 हजार 200 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी 7 हजार रुपये प्रति हेक्टरी मदत म्हणून सोलापूर जिल्ह्याला 76 कोटी 69 लाख रुपये मिळाले आहेत.