पाटणा : देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या निकालात नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार की तेजस्वी यांचे तेज झळकणार, हे आता काही तासांनी कळणार आहे. विधानसभेच्या २४३ मतदारसंघातील मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरु झाली आहे. ३८ जिल्ह्यात ५५ ठिकाणी ही प्रक्रिया होत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज मंगळवारी लागतील. नितीश कुमार सत्ता राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. सुरुवातीच्या मोजणीचे जे कल समोर येत आहेत त्यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडी वेगाने घोडदौड करत असल्याचं दिसून आलं आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा आहेत. बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र नितीशकुमार यांचे अनेक मंत्री पिछाडीवर आहेत. विशेषतः रमेश ऋषिदेव सिंहेश्वर येथून आघाडीवर आहेत. जयकुमारसिंह हे दिनारा येथून, खुर्शीद अहमद सिकटा येथून तर शैलशकुमार हे जमालपूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
बिहार निवडणुकांसंबंधीच्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात अटीतटीची लढत पहायला मिळाली.
* गुगल सर्चवर तेजस्वी यादवांनी मारली बाजी
सायंकाळ पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. या वेळी बिहार सिंहासनावर तेजस्वी बसणार की नितीश याची चर्चा होत असली तरी सध्या तरी तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर गुगल सर्च मध्ये तरी बाजी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. लालू प्रसाद यादव यांच्या उपस्थितीशिवाय यंदा पहिल्यांदा राजद पक्ष निवडणूकीमध्ये उतरला आहे. त्यांचे लेक तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
नऊ नोव्हेंबर रात्रीपासूनच तेजस्वीने गुगल सर्च वर नितीशना मागे टाकले आहे. पहाटे दोनच्या सुमारास नितीश यांचा सर्च व्हॉल्युम ९ होता तर तेजस्वी यांचा सर्च व्हॉल्युम ४३ वर होता. त्यात सतत वाढ होताना दिसत आहे. तेजस्वीने २१ दिवसात २५१ प्रचार सभा घेतल्या होत्या. म्हणजे दिवसाला १२ सभा त्यांनी घेतल्या होत्या.
सध्या तरी काँग्रेसचे नेता लव सिन्हा देखील आघाडीवर आहेत. ते बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र आहेत. त्यासोबतच झमामगंज या विधानसभा मतदार संघामध्ये हिंदुस्तानी आवाम मोर्चा म्हणजेच हम पार्टीचे जीतन राम मांझी सुरूवातीला पुढे जात होते मात्र नंतर मागे पडले आहेत. दरम्यान हम या निवडणूकीमध्ये एनडीए सोबत आहेत. पप्पू यादव देखील मागे पडले आहेत.
मुजफ्फरपूर विधानसभा जागेवर एनडीएचे सुरेश शर्मा आणि महागठबंधनचे कॉंग्रेस नेता विजेंद्र चौधरी यांच्यामध्ये जबरदस्त टक्कर सुरू आहे. परसा सीटवर तेज प्रताप यांचे सासरे चंद्रिका राय थोडे मागे पडले आहेत.
* सुरुवातीचे कल
– बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान सुरुवातीचे कल महागठबंधनच्या बाजूने असल्याचं सर्व माध्यमांवर दिसत आहे.
– पण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भाजप सर्वात पुढे असल्याचं दिसून येत आहे.
– निवडणुकीच्या पहिल्या ४३ जागांचे कल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. यामध्ये भाजप सर्वाधिक १५ जागांवर पुढे असल्याचं दिसत आहे. पाठोपाठ राजद ९ आणि जनता दल ८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे.
– बिहारमध्ये एनडीएप्रणित आघाडीनं नितीन कुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं आहे, तर महाआघाडीनं तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे.
– नितीश कुमार यांनी प्रचारसभांमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या काळातील ‘जंगलराज’वर वारंवार टीका करत जनतेनं परत एकदा सत्ता द्यावी,असं आवाहन केलं होतं. तर तेजस्वी यादव यांनी ही निवडणूक रोजगाराच्या मुद्द्यावर लढली जात असल्याचं म्हटलं.
– तेजस्वी यादव यांच्या सभांना होणारी गर्दीही या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरली होती. एका दिवसात ते १६ ते १९ सभा घेत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.