पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र, तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा भाऊ लव सिन्हा याला पराभवाचा धक्का बसला आहे.
बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या नितीन नवीन यांनी लवला ‘खामोश’ केले. बांकीपूर विधानसभा मतदारसंघात नितीन नवीन हे सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत.
त्यांनी 33 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवत विजय मिळवला. एकूण मतांपैकी 61 टक्क्यांपेक्षा अधिक मतं नवीन यांना मिळाली. जवळपास 18 हजारांच्या मताधिक्याने ते विजयी झाले. काँग्रेस उमेदवार लव सिन्हा हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 15 हजारांच्या आसपास मतं त्यांच्या पारड्यात पडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा पटना साहिब लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले, मात्र भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी सिन्हांना पराभवाची धूळ चारली होती.
* लंडनहून आलेल्या चौधरीचा पराभव
विशेष म्हणजे स्वतःला मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार घोषित करणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी बांकीपूरमधूनही रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. अवघी 1991 मतं मिळवत त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. चौधरी या निवडणूक लढवण्यासाठी लंडनहून आल्या होत्या. बांकीपूरमधून एकूण 22 उमेदवार नशीब आजमावत होते.