मुंबई : दिवाळी आणि सुट्ट्यांच्या हंगामात रेल्वे गाड्या मर्यादित आहेत तसेच एसटीही फुल्ल होऊ लागल्या आहेत. याचा फायदा या खासगी बस चालकांनी तिकीट दर दिवाळीचा मुहूर्त साधून अव्वाच्या सव्वा केले आहेत. मुंबई ते नागपूर, औरंगाबाद, परभणी आदी सर्वच मार्गांवर खासगी बससेवांचे भाडे दीडपट ते दुप्पट वाढवण्यात आल्याने प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे.
दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत मुंबई व पुणे शहरातून खूप प्रवासी गावी जातात आणि परत येतात. त्या काळात खासगी प्रवासी बसेसव्दारे मोठ्या प्रमाणात अवाजवी भाडे आकारले जाते. त्याबाबत तक्रारी येत असतात. शासन निर्णयाच्या मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई करावी, असे आदेश परिवहन उप आयुक्तांनी दिले आहेत. सण, सुट्ट्यांच्या हंगामात खासगी बसचालकांकडून जादा दर आकारले जाण्याची तक्रार कायम असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत भाडेवाढ केली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* दिलासा : तिकीट दर जैसे थे
दिवाळीत एसटीकडून तिकिटदरात १० टक्के भाडेवाढ करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. तिकीट दर जैसे थे असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. काही कारणास्तव तत्काळ परभणीला जावे लागत आहे. पूर्वी ८०० रुपये तिकीट होते, मात्र आता १९०० मोजावे लागत आहे. गरज असल्याने एवढे पैसे देण्याशिवाय पर्याय नसल्याची खंत प्रवाश्यातून व्यक्त केली जात आहे.