गुवाहाटी : आसामच्या कामरूप जिल्ह्यात एका 42 वर्षीय पत्रकारावर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. पोलीस आरोपींवर कारवाई करण्यास अपयशी ठरल्याचा दावाही या पत्रकाराने केला आहे. स्थानिक जमीन हस्तगत करण्याच्या कामांबद्दल दिलेल्या अहवालानंतर त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा प्रकार रविवारी घडला.
आसामी वृत्तपत्र ‘प्रतिदिन’ या अग्रगण्य संस्थेमध्ये काम करणारे मिलन महंता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांनी जुगार आणि जबरदस्तीने जमीन संपादन करण्याच्या घटना उघडकीस आणल्यानंतर, त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांना एका इलेक्ट्रिक पोलला बांधून मारहाण करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत सर्व हल्लेखोरांची नावं असूनही आतापर्यंत केवळ एका आरोपीला अटक करण्यात आल्याचं मिलन यांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महंता गेल्या दोन दशकांपासून क्राईम बीटवर रिपोर्टिंग करतात. या हल्लेखोरांनी, गुंडांनी संपूर्ण परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे नियम कशाप्रकारे धाब्यावर बसवले आहेत, याबाबत स्थानिकांनाही माहिती असल्याचं महंता यांनी ‘द प्रिंट’शी बोलताना सांगितलं.
स्थानिक गुंड संजय ठाकुरिया, बुडू ठाकुरिया आणि दिगंता दास हे केवळ जुगारच खेळत नाहीत, तर बेकायदेशीरपणे जमीन हडपण्यामध्येही त्यांचा मोठा भाग असतो. मी या सर्व प्रकाराबाबत बातमी दिली, त्यांच्या या बेकायदेशीर गोष्टींकडे सर्वांच लक्ष वेधून घेतल्यानंतर त्यांनी माझ्यावर हल्ला केल्याचं, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णालयातून ‘द प्रिंट’शी बोलताना त्यांनी सांगितलं.
त्यांना मला ठार मारायचं होतं, असं वाटतं. यापूर्वीही त्यांच्या विरोधात मी अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. मला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या लोकांवरही त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेला तीन दिवस झाले असूनही अद्याप पोलीस या घटनेच्या चौकशीसाठी, पुढील तपशील घेण्यासाठी आले नाहीत. मिलन यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला, त्या ठिकाणापासून केवळ 5 किलोमीटर अंतरावर अमरंगा गावात ते राहतात.
* पत्रकारांकडून मोठा संताप
एका व्हायरल व्हिडिओमधून हे प्रकरण समोर आल्यानंतर, पत्रकारांकडून मोठा संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे पत्रकारांनी हल्लेखोरांवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, गुवाहाटीपासून 45 किलोमीटर पश्चिमेकडील कामरूप मिर्झा भागातील स्थानिक पत्रकार या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत.